खासदार जगदीश शेट्टर यांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डअंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतींचे बेळगाव महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून रखडली असून, त्या प्रक्रियेला गती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. बुधवारी दिल्ली येथे खासदार शेट्टर यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. कर्नाटकातील एकमेव बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.
यासंदर्भात कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव व दिल्ली येथील संरक्षण विभागाचे सचिव यांना हस्तांतरणाच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. रहिवासी वसाहतींचे हस्तांतरण करताना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू तसेच यंत्रांचे उत्पादन होते. उद्योगांसाठी जमीनही उपलब्ध आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने आपली उत्पादने उत्पादित करणारे कारखाने या ठिकाणी सुरू करावेत, त्यामुळे बेळगाव परिसरात रोजगार वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले.









