प्राणी कल्याण स्वयंसेवी संस्थेची मागणी
बेळगाव : भटक्या कुत्र्यांचे हल्ले शहरात वाढू लागले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया अर्थात नसबंदी गतिमान करावी, अशी मागणी प्राणी कल्याण स्वयंसेवी संस्थेने पत्रकार परिषदेत केली आहे. शहरात साधारण 20 हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. अलिकडे या कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या प्रजननाच्या तुलनेत निर्बिजीकरण शस्त्रक्रिया कमी असल्याने संख्येत मोठ्याने भर पडू लागली आहे. वाढत्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात मनपा अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेचा वेग वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. शिवाय मनपाने कुत्र्यांच्या नसबंदीचे उद्दिष्ट वाढवून भटक्या कुत्र्यांवर आळा घालावा. यावेळी डॉ. प्रवीण मठपती, वरुण कारखानीस, सौरभ सामंत, निकिता कुंटे आदी उपस्थित होते.









