सुसज्ज फलाटची उभारणी, प्रवाशांचा प्रश्न मार्गी
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात भव्य फलाट उभारणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच बसस्थानकात सुसज्ज फलाट उभा राहणार आहे. त्यामुळे बसबरोबरच प्रवाशांचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे. यासाठी सपाटीकरण आणि भराव्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
जुने बसस्थानक हटवून नवीन आधुनिक बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना शहर आणि ग्रामीण भागासाठी सुसज्ज फलाट उभारला जात आहे. बससेवा सुरळीत व्हावी आणि प्रवास सुखकर व्हावा, यासाठी स्वतंत्र फलाट उभारले जात आहेत. त्यामुळे स्थानक आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना सोयीस्कर होणार आहे. एकाच वेळी शेकडो बस थांबतील या स्वरुपाचे फलाट उभारले जात आहेत. बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्य लागून आहे. यासाठी बसस्थानकात गोवा आणि महाराष्ट्राच्या बसेससाठी स्वतंत्र फलाट उभारला जात आहे. त्यामुळे बस शोधण्यासाठी होणारी प्रवाशांची धावपळ थांबणार आहे.
बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांनी गजबजलेले असते. दरम्यान, प्रवाशांना बस शोधताना अडचणी येत असतात. मात्र आता स्वतंत्र फलाट उभारले जात असल्याने प्रवाशांची ही समस्या देखील मार्गी लागणार आहे. शहर, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या बस, महाराष्ट्र बस, गोवा बस यांच्यासाठी स्वतंत्र फलाट उभारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वत:ची बस शोधण्यास वेळ घालवावा लागणार नाही. बेळगाव बसस्थानकातून दररोज 700 बसेस विविध मार्गांवर धावतात. शिवाय परराज्यातून देखील बस येत असतात. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीखातर फलाट उभारला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची शोधाशोध आता थांबणार आहे.









