मिरज-बेंगळूर मार्गावर विद्युत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा
बेळगाव : पुणे-लोंढा रेल्वेमार्गावरील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या कुडची-मिरज रेल्वेमार्गाची सोमवारी वेग चाचणी घेण्यात आली. यामुळे मिरज ते बेंगळूरपर्यंतचा रेल्वेमार्ग आता दुहेरी झाला असून विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे-बेळगाव वंदे भारत सुरू होण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मिरज-लोंढा या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत होते. कुडची हे रेल्वेस्थानक नैर्त्रुत्य रेल्वेच्या हद्दीत येते. तर मिरज रेल्वेस्थानक मध्य रेल्वेच्या अखत्यारित येते. मिरज-लोंढा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी लोंढा-मिरज मार्गावरील सीएसआर सर्वेक्षण झाले नव्हते. यामुळे विद्युत इंजिनावर एक्स्प्रेस धावण्यास विलंब होत होता.
वंदे भारतसाठी आशा पल्लवित
सोमवारी मिरज-कुडची या मार्गावर नैर्त्रुत्य रेल्वेकडून स्पीड ट्रायल (वेग चाचणी) घेण्यात आली. पुणे-बेळगाव मार्गावर वंदे भारत सुरू करण्यास हालचाली सुरू असतानाच आता मिरज-कुडची मार्गावर स्पीड ट्रायलही घेण्यात आल्याने प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मिरज-पुणे या मार्गावर काहीअंशी काम अपूर्ण असले तरी लवकरच वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे.









