कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून गतिरोधक घातल्याने वाहनांना धोका
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी-चोर्ला रस्त्यावरील चौकी येथील अबकारी नाक्याजवळ घालण्यात आलेला गतिरोधक वाहनधारकांना अतिशय धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे चोर्ला ते रणकुंडये रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेले असून हा रस्ता राष्ट्रीय महामार्गमध्ये समाविष्ट आहे. वास्तविक राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक घालण्यास प्रशासनाने बंदी घातलेली आहे. असे असताना कंत्राटदाराने राष्ट्रीय महामार्ग विकासाचे नियम धाब्यावर बसवून कणकुंबी (चौकी) अबकारी नाक्याजवळ गतिरोधक घातला आहे. तसेच सदर गतिरोधक एव्हढा मोठा आहे की लहानसहान चारचाकी गाड्यांचे बोनेट गतिरोधकाला घासत आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वार गतिरोधकावरून घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. ट्रक किंवा इतर वाहनांना यामुळे समस्या निर्माण होत असल्याने वाहनधारकांमधून तीव्र विरोध होत आहे.
गतिरोधक काढून बॅरिकेड्स लावा
बेळगाव-गोवा रस्त्यापैकी चोर्ला रस्ता सोयीस्कर असल्याने या मार्गावरून अनेक वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. गोव्यात मद्य स्वस्त असल्याने दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ शकते म्हणून कर्नाटक शासनाने कणकुंबी चौकी येथे अबकारी खात्याचा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. गोव्यातून येणारी सर्व वाहने सदर नाक्यावर अडवून तपासणी केली जाते. त्यासाठी अबकारी खात्याने बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी करत असताना अबकारी अधिकाऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून कंत्राटदाराने नियमबाह्य गतिरोधक घातला आहे.
गतिरोधक काढून बरिकेडस् काढा
या गतिरोधकामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने सदर गतिरोधक काढून महामार्ग अडथळामुक्त करावा व अबकारी अधिकाऱ्यांनी बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.









