शानदार सोहळ्याने सुऊवात : अरिजित सिंग, तमन्ना भाटिया, रश्मिका मंदानाच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध, प्रेक्षकांनी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’
वृत्तसंस्था /अहमदाबाद
क्रिकेट रसिकांकडून ज्याची उत्साहाने प्रतीक्षा केली जाते त्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ची दिमाखदार सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या शानदार उद्घाटन सोहळय़ाने ‘आयपीएल धमाका’ सुरू झाला. यावेळी स्टेडियम खचाखच भरून गेले होते आणि वातावरण पूर्णपणे भारून गेले होते. बॉलीवुडचा प्रसिद्ध प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने सादर केलेली गीते तसेच अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी सादर केलेली नृत्ये हे या सोहळय़ाचे वैशिष्टय़ राहिले. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पुनरागमनाने झाली. 90 च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने क्रिकेट प्रसारणावेळी सादर केल्या जाणाऱया कार्यक्रमांत प्रवेश केला होता. परंतु काही वर्षांनंतर मंदिरा बेदी त्यापासून दूर गेली होती. परंतु जगातील सर्वांत मोठय़ा आणि खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये शुक्रवारी तिने दणक्यात पुनरागमन केले.
या सोहळय़ाच्या दरम्यान प्रख्यात पार्श्वगायक अरिजित सिंगने आपल्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमादरम्यान त्याची काही प्रसिद्ध ‘चार्टबस्टर’ गाणी सादर करून प्रेक्षकांवर भुरळ टाकली. यात ताज्या ‘तू झुठी मै मक्कार’ चित्रपटातील ‘तेरे प्यार में’, ‘एक बार ही किया’सह ‘केशरिया’, ‘चन्ना मेरेया’, ‘कबिरा, ‘तुजे कितने चाहने लगे हम’, हवाये, आदी गीतांचा समावेश होता. त्याने गीटार हातात घेऊन एका कारमध्ये बसून स्टेडियमच्या सीमारेषेभोवती फेरफटका मारला त्यावेळी लोकांनी मोठय़ा प्रमाणात दाद दिली. त्याच्या पाठोपाठ भारताचा ध्वज आणि आयपीएल संघांचे झेडे घेतलेले काही लोकही होते. त्यानंतर दाखल झालेल्या तमन्ना भाटियाने अरिजितच्या सादरीकरणावर साज चढवताना जबरदस्त पदन्यासासह प्रेक्षकांची मने जिंकली. तमन्नाच्या पाठोपाठ रश्मिका मंदानाची ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी’सह विविध गीतांवरील अदाकारीही भुरळ पाडणारी ठरली. तिने ‘आरआरआर’मधील ऑस्करविजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमांची सांगता झाली. त्यानंतर ‘चेन्नई सुपर किंग्स’चा एम. एस. धोनी आणि ‘गुजरात टायटन्स’चा हार्दिक पंडय़ा या शुभारंभी सामन्यांत खेळणाऱया दोन्ही संघांच्या कर्णधारांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि ‘आयपीएल’ अध्यक्ष अरुण धुमल यांच्यासह व्यासपीठावर आमंत्रित केले गेले. दोन्ही कर्णधारांनी रथाप्रमाणे सजविलेल्या वाहनातून प्रवेश केला. यात हार्दिक पंडय़ा हा ‘आयपीएल चषक’ घेऊन दाखल झाला. चषकासोबतचे त्यांचे छायाचित्र घेतल्यावर नेत्रदीपक आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता झाली. 2018 नंतर प्रथमच ‘आयपीएल’चा अशा प्रकारचा उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर ‘गुजरात टायटन्स’ आणि ‘चेन्नई सुपर किंग्स’ यांच्यातील सलामीचा सामना रंगला.