महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थानमधील चाहत्यांना दिलासा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांना आता 14 ऑक्टोबरची प्रतीक्षा असून याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने भारत-पाकिस्तान सामन्यासाठी विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातून विशेष वंदे भारत ट्रेन अहमदाबादला रवाना होणार आहेत. या गाड्यांची वेळही क्रिकेट चाहत्यांच्या सोयीनुसार ठेवण्यात येणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत विशेष गाड्यांची वेळ सामना सुरू होण्याच्या काही तास आधी अहमदाबादला पोहोचतील अशी ठेवण्यात येणार आहे. तसेच सामना संपल्यानंतर ह्या ट्रेन माघारी परतणार असल्याने चाहत्यांना रात्री अहमदाबादमध्ये थांबावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही वाचेल, असा दावा केला जात आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यामुळे 14 ऑक्टोबरसाठी रेल्वे आणि विमानांसह सर्व तिकिटे बुक झाली आहेत. इतकेच नाही तर अहमदाबादची हॉटेल्सही हाऊसफुल्ल आहेत. आता लोकांना हॉटेलमध्ये खोल्याही मिळत नाहीत. अशा परिस्थितीत वंदे भारत रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अहमदाबादमध्ये विशेष मेट्रोही धावणार
गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनेही भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी मेट्रो ट्रेनच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दिवशी मेट्रो ट्रेन सकाळी 6.20 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत धावतील. मेट्रोच्या या प्रवासासाठी 50 रूपयांचे तिकीटदरही निश्चित करण्यात आले आहेत.









