गोवा कॅन्सर संस्थेचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांची माहिती
पणजी : कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब याशिवाय इतर गंभीर आजारांच्या संशोधनासाठी रक्ताचे नमुने घेण्याबरोबरच वजन तसेच इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी खास कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा कॅन्सर संस्थेचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली. कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजारांची कारणे तपासून पाहण्यासाठी ‘दीर्घकालावधी गट अभ्यास’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. आरोग्य संचालनालय टाटा मेमोरियल हॉस्पिटल (मुंबई) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या सहकार्याने हे आजारांचे संशोधन होणार आहे. 1 लाख लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्याबरोबरच इतर माहिती प्राप्त करून आजारांबाबत संशोधन करण्यात येणार आहे. 1 लाख लोकांची तपासणी व माहिती घेण्यास एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागेल. यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तज्ञ ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने संशोधन करतील, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात खर्चाच्या तरतुदीबाबत मागणी
सांखळी, वाळपई, काणकोण व किनारपट्टी भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यासाठी आरोग्य खात्यातर्फे खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. उपक्रमासाठी आरोग्य खात्याला वर्षाला 3 कोटी ऊपये खर्च येण्याचा अंदाज असल्याने अर्थसंकल्पात खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे करण्यात आल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.









