गोव्यातील कला आणि संस्कृतीचे घडतेय दर्शन
पणजी : राज्यातील जी-20 बैठक संपुष्टात येत असताना जी-20 गोवातर्फे खास तयार केलेल्या स्मरणिका उपस्थित प्रतिनिधींना देण्यात आली. बैठकीच्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या विषयाला अनुसऊन आहे. स्मरणिकांमध्ये राज्याची प्रतिमा रेखाटण्यात आली. राज्य सरकारने आणि जी-20 गोवा यांनी भेटवस्तूसाठी योग्य वस्तू निवडण्यासाठी खूप विचार केला आहे. तसेच हे सूनिश्चित केले आहे की, त्यातील प्रत्येक गोष्टीत राज्याचे सार आणि त्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधीत्व दिसून यावे. त्याचप्रमाणे स्थानिक कारागिरांना त्यांच्या कौशल्य आणि कलेच्या माध्यमातून जी-20 शी संलग्न होण्याची संधी दिली आहे, असे जी-20 गोवाचे प्रमुख अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले. शाश्वतता आणि स्वावलंबनाचा संदेश प्रत्येक वस्तुद्वारे प्रतिनिधींना देण्यात आला आहे. याशिवाय, स्मरणिकेचा भाग म्हणून सादर केलेल्या प्रत्येक भेट वस्तुमध्ये गोव्याचे विविध घटक आहेत जे राज्याचे सार आणि संस्कृती, परंपरा आणि राहणीमान दर्शवतात. अझुलेजो टाईल्स इनलेसह पुनर्नवीनीकरण केलेले लाकूड सर्व्हिंग ट्रे, कुणबी बॅग्स, गोव्याच्या घराच्या प्रतिकृती, समई, टेराकोटा कमळाच्या आकाराची अगरबत्ती होल्डर, बीच योग मॅट, सेंद्रीय सुगंधी मेणबत्ती, तांब्याची बाटली, सेंद्रीय गोवा काजू फेणी अशा वस्तुंचा यामध्ये समावेश होता, असे रॉड्रिग्स यांनी पुढे सांगितले.









