नव्या सभापतींची होणार निवड : मोदी, राधाकृष्णन यांचे अभिनंदन
पणजी : सभापती निवडणूक आणि इतर कामकाजासाठी आज गुरुवार दि. 25 रोजी एक दिवसाचे विशेष विधानसभा अधिवेशन होणार असून ते नेहमीप्रमाणे सकाळी 11.30 वा. सुरू होईल. राष्ट्रगीताने या अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. प्रथम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कामकाज सल्लागार समितीचा अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर मतदानाने सभापतीपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान गोवा पर्यटन विकास महामडळाच्या अध्यक्षपदाचा आमदार गणेश गावकर यांनी काल बुधवारी राजीनामा दिला आहे. आमदार गणेश गावकर हे सत्ताधारी पक्षाचे तर एल्टोन डिकॉस्ता हे विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. निवडणूक झाल्यानंतर अभिनंदनाचे दोन ठराव मांडले जातील.
डॉ. सावंत हेच दोन्ही ठराव सादर करणार आहेत. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपतीपदी निवड झाली म्हणून त्यांचे अभिनंदन करणारा ठराव असून दुसरा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा आहे. जीएसटी दरकपात व सुधारणा लागू केल्या. यासाठी मोदींचे अभिनंदन करण्यात येणार आहे. विकसित भारत 2047 च्या ध्येयाला गोवा सरकारचा पाठिंबा असून त्यासाठी मोदींचे अभिनंदन ठरावाद्वारे होणार आहे. विविध विषयावरील सभागृह समिती व चिकित्सा समिती यांची पुनर्रचना करण्यात येणार असून 2025-26साठी विविध समित्यांची फेररचना केली जाणार आहे. सर्व कामकाज संपल्यानंतर शेवटी राष्ट्रीय गीताने अधिवेशनाची सांगता होणार आहे. गोवा विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी वरील माहिती दिली आहे. अधिवेशनाच्या समाप्तीनंतर दुपारी 1 वा. मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे.









