केजरीवालांची आज सीबीआय मुख्यालयात चौकशी : कडक बंदोबस्त तैनात
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पार्टी (आप) सरकारने दिल्ली विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन आमंत्रित केले आहे. सोमवार, 17 एप्रिल रोजी हे अधिवेशन होणार असून तत्पूर्वी रविवारी केजरीवाल यांची मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआय चौकशी होणार आहे. केजरीवालांच्या चौकशीदरम्यान सीबीआयने आपल्या मुख्यालयाभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे नियोजन केले आहे. रविवारी आजूबाजूची कार्यालये बंद राहिल्यामुळे सुटीचा दिवस चौकशीसाठी निश्चित करण्यात आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) चौकशीसाठी बोलावल्यानंतर तातडीने विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचे नियोजन करण्यात आल्याचे समजते. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवार, 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. काही मद्यविव्रेते आणि दक्षिण लॉबीच्या बाजूने धोरणात बदल करून जमा केलेला पैसा ‘आप’द्वारे निवडणुकीच्या उद्देशाने वापरला जात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे.
दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या मद्य धोरणात काही दारू व्यापाऱ्यांना परवाने देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. मात्र, आम आदमी पक्षाने (आप) हा आरोप फेटाळून लावला. अबकारी धोरणात सुधारणा, परवानाधारकांना अवाजवी फायदा देणे, परवाना शुल्कात सूट/कपात, मंजुरीविना एल-1 परवाना मुदतवाढ इत्यादीसह अनियमिततेचा आरोप या घोटाळ्यामध्ये झाला होता. हे धोरण नंतर मागे घेण्यात आले होते.









