आर. व्ही. देशपांडे हंगामी सभाध्यक्ष
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. याचबरोबर शनिवारी नूतन मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमारांनी शपथ घेतली आहे. याचबरोबर 8 कॅबिनेट मंत्रीही शपथबद्ध झाले आहेत. दरम्यान, सोमवार दि. 22 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे 16 व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन असणार आहे. सभागृहाचे सर्वात ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांना हंगामी सभाध्यक्ष म्हणून कामकाज चालविण्याची विनंती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री यासंबंधीचा अधिकृत आदेश राजभवनातून जारी करण्यात आला आहे.
बेंगळूरमधील विधानसौधमध्ये तीन दिवस विधानसभेचे अधिवेशन भरविण्यासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी परवानगी दिली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदार या अधिवेशनावेळी शपथ ग्रहण करतील, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. याचबरोबर सोमवारीच नूतन विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









