8 जुलै रोजी अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता
प्रतिनिधी /मडगाव
सरकारपक्षानेच दाखल केलेल्या क्रिकेट घोटाळा खटल्याच्या न्यायालयीन सुनावणीच्यावेळी बुधवारीही सरकारपक्षातर्फे खास सरकारी वकील न्यायालयात उपस्थित नव्हता तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपींना त्यांचे म्हणणे सादर करण्याकरिता लागणाऱया पुराव्याचे गाठोडेही न्यायालयाकडे नसल्यामुळे या प्रकरणाची आता अंतिम युक्तिवाद 8 जुलै रोजी होणार आहे.
बुधवारी या प्रकरणासंबंधीचा खटला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात सुनावणीस आला तेव्हा सरकरपक्षातर्फे खास वकील न्यायालयात पुन्हा एकदा उपस्थित नव्हता.
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार एप्रिल 2001 मध्ये भारत – ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या एक दिवसीय क्रिकेट सामना फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर झाला होता. या स्टेडियमची प्रेक्षक बसण्याची क्षमता 27,300 आसनाची असतानाही 29,000 तिकेटी छापण्यात आल्या होत्या. त्यात कित्येक बनावट तिकेटी असल्याचा सरकारपक्षाने आरोप ठेवलेला होता.
परिणामी, या आंतरराष्टीय सामन्याच्यावेळी स्टेडियममध्ये प्रवेश घ्यायला एकच गोंधळ गडबड झाली होती आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला होता असे न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे.
माजी कायदा मंत्री दयानंद नार्वेकर, रामनाथ शंकरदास, विनोद फडके, चिन्मय फळारी, देवदत्त फळारी, व्यंकटेश राऊत देसाई, ज्योकीम पिरीस, गंगाराम भिसे, एकनाथ नाईक हे या क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.









