खानापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र तसेच मलप्रभा नदीकिनाऱ्यांवर पवित्र स्नानासाठी होणार भाविकांची अलोट गर्दी
खानापूर : मकर संक्रांतीनिमित्त खानापूर तालुक्मयातील काही तीर्थक्षेत्र तसेच मलप्रभा नदी किनाऱ्यांवरील काही मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. तसेच मकर संक्रांतीनिमित्त गंगा स्नानाला महत्त्व असल्याने मलप्रभा नदीपात्राच्या किनाऱ्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात स्नानासाठी गर्दी असते. यात असोगा रामलिंग मंदिर, खानापूर मलप्रभा नदीघाट तसेच पंचमुखी महादेव मंदिर, हंडीभडंगनाथ मठ तसेच नंदगड येथील तीर्थक्षेत्रावर विशेष पूजेचे आयोजन केले जाते. पूजेसाठी व दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. यावषी मकर संक्रांती सोमवार दि. 15 रोजी व कंक्राती मंगळवार दि. 16 रोजी होणार आहे.
असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिर
असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिराशेजारी मलप्रभा नदीचे पात्र आहे. शिवाय पाणीही बऱ्यापैकी राहिल्याने अनेक भाविक मलप्रभा नदीपात्रात स्नानासाठी आवर्जुन उपस्थित असतात. शिवाय रामलिंगेश्वराचे दर्शन व परिसरातील विलोभनीय दृश्य, यामुळे भाविकांना आनंद घेता येतो. खानापूर शिवस्मारक सर्कलपासून असोगा गावापर्यंत खासगी वाहनांची सोय असते. शिवाय दुचाकी व ट्रॅक्टरवरून अनेक भाविक येत असतात.
मलप्रभा नदीकाठावरील पंचमुखी महादेव मंदिर
खानापूर शहराच्या मलप्रभा नदीकाठावर संक्रांतीनिमित्त मलप्रभा स्नानाचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. येथील पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच सुऊवात होते. दिवसभर लोकांची गर्दी असते. अनेकजण मलप्रभा नदीत स्नान करून, नदी पूजा व नदी परिसरात स्वयंपाक बनवून प्रसाद बनवून त्याचा लाभ घेतात.
नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठ
खानापूर तालुक्मयाच्या दक्षिण भागात कुंभार्डा गावाजवळ असलेल्या नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठावर संक्रांतनिमित्त मठात विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. खानापूर, धारवाड, हल्याळ, बैलहोंगल, जोयडा परिसरातील अनेक भाविक या मठावर आवर्जुन उपस्थित असतात. या ठिकाणीही भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात येते.
हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान मंदिर
मलप्रभा नदीपात्रालगत असलेल्या हब्बनहट्टी येथील स्वयंभू श्री हनुमान मंदिरात मकरसंक्रांतनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. खानापूरसह जांबोटी व बेळगाव परिसरातील अनेकजण या ठिकाणी उपस्थित राहतात. नदीपात्रातील आनंद लुटण्यासाठी व देवदर्शन घेण्यासाठी सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित असतात.









