महामार्गावर कार्यरत होणार एआय कॅमेरे : पोलिसांची तालाव देणे पद्धत होणार बंद
पणजी / प्रतिनिधी
वाहतूक खात्यावर नजर ठेवण्याबरोबरच तालाव देण्यासाठी एआय सिग्नल यंत्रणा बसवण्याचे धोरण तयार करण्यात येणार आहे. पोलिसांकरवी तालाव देण्याची पद्धत वर्षभरात बंद होईल. वाहतूक सिग्नल यंत्रणा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी सभागृहात सांगितले.
विधानसभेत गुरूवारी सार्वजनिक बांधकाम खाते, कायदा आणि पर्यावरण खात्याच्या मागण्यांवर चर्चा होऊन मागण्यांना मान्यता देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक घालण्यास मिळत नाही. परंतु ‘रम्बलर स्ट्रीप’ घालणे शक्य आहे. राष्ट्रीय महामार्गावर एआय कॅमेऱ्यांद्वारे वाहनांच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटवली जातील. नियमाप्रमाणे अन्य रस्त्यांवर गतिरोधक घातले नाही तर संबंधित अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असेही काब्राल म्हणाले.
पाण्याची नाशाडी, गळती थांबवणार
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे राज्यातील सर्वांना पाणी मिळते. सध्या 39 टक्के (एनआरडब्ल्यू) पाण्याच्या बिलाची रक्कम येणे बाकी आहे. राज्यात 200 एमलएलडी पाण्याची नाशाडी होते. पीपीपी पद्धतीने मीटर बदलण्यासह जलवाहिनी बदलून पाण्याची होणारी नासाडी थांबवली जाणार आहे. बंधाऱ्याच्या व धरणाच्या पाण्याची गळती शोधण्यासाठी खास अॅप सुरू करण्यात येईल. रस्त्यावरील खड्डे शोधण्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. खड्डे बुजविण्यासाठी खात्याने 7 जॅट पॅचर मशिन्स आणल्या आहेत. 4 जॅट पॅचर मिशन उत्तर गोव्यासाठी तर 3 जॅट पॅचर मिशन दक्षिण गोव्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
साबांखामध्ये चारशे अभियंत्यांची कमतरता
सार्वजनिक बांधकाम खात्यात 400 हून अधिक अभियंत्यांची कमतरता आहे. रस्त्यावरील लहान साकवांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच गरज भासल्यास साकवांची दुरुस्तीचे काम करण्यात येईल. सरकारी इमारतींची वर्षभरात दुऊस्ती करण्यात येईल. नवीन रंग देणे, डागडुजी करण्यात येत असल्यामुळे वर्षभरात सर्व सरकारी इमारतींमध्ये बदल झाल्याचे दिसेल, असेही काब्राल म्हणाले.
किनाऱ्यांवर जे वंगणाचे तवंग तयार होतात त्याबाबतची कारणे शोधण्यासाठी केंद्राने एनआयओ अंतर्गत एजन्सीची नेमणूक केली आहे, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. जुवारी पुलावर उभारणार रिवोल्विंग टॉवर जुवारी नदीच्या पुलावर रिवोल्विंग टॉवर उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या निविदेत रिवोल्विंग टॉवरचा समावेश नाही. त्यामुळे वेगळी निविदा काढून राज्य सरकार हा टॉवर उभारणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत पुलाची आणखी एक बाजू सुरू होईल, असेही ते म्हणाले.
पाण्याच्या टॅंकरसाठी नवी व्यवस्था
पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, व्यावसायिक पाणी टॅंकर, मलनिस्सारण पाण्याचे टॅंकर अशी स्वतंत्र टॅंकरची नोंदणी केली जाईल. पाणीपुरवठा खात्याकडे यांची नोंदणी होईल. त्यामुळे गैरव्यवहारांवर नजर ठेवणे सोपे होईल, असे ते म्हणाले.









