वारणानगर, प्रतिनिधी
Vinay Kore News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे मंगळवार (दि-१८) रोजी सांयकाळी ५ वा हॉटेल अशोक येथे बैठक बोलवण्यात आली आहे. या सर्वपक्षीय (एनडीए)च्या बैठकीसाठी जनसुराज्यशक्ती पक्षास निमंत्रीत करण्यात आले आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आमदार डॉ.कोरे यांना खास निमंत्रण पाठविण्यात आले आहे. गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत देशाच्या विकासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मित्रपक्षांचे देखील योगदान आहे. या बैठकीसाठी देशभरातील वेगवेगळ्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी या बैठकीचे निमंत्रण आमदार विनय कोरे यांना पाठविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आमदार कोरे हे सोमवारी या बैठकीसाठी रवाना होणार आहेत.