एलईडी दिव्यांसह आकर्षक विद्युत माळा विक्रीसाठी दाखल
बेळगाव : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी काहीच दिवस उरले असल्याने तयारीला वेग आला आहे. घरगुती सजावटीसाठी यावर्षी विविध प्रकारचे एलईडी दिवे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध आकारांमध्ये व रंगांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले दिवे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती मंडपांमध्ये विद्युत दिव्यांच्या साहाय्याने आकर्षक रोषणाई केली जाते. मागील काही वर्षात चायनीज माळा मोठ्या प्रमाणात विक्री होत होत्या. परंतु, या माळा लवकर खराब होत असल्याने आता एलईडी दिवे बाजारात दाखल झाले आहेत. अत्यंत कमी दरात जास्त प्रकाशाचे एलईडी खरेदी करण्याकडे गणेशभक्तांचा ओढा आहे. शहरातील बापट गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली आदी परिसरात विद्युत माळा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एलईडी विद्युत माळांसह विविध प्रकारचे झुंबर, डेकोरेशनसाठी उपलब्ध असलेले लाईट्स, फुले व फळांच्या आकारामधील मोठे दिवे, समई, प्रभावळी, विजेवर चालणारे सुदर्शन चक्र, फोकस लाईट्स यांची विक्री जोरात सुरू आहे. 50 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत गुणवत्तेनुसार या लाईट्सची विक्री केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरामध्ये किंचितशी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
स्थानिक विद्युत माळांनाही वाढती मागणी
एलईडीच्या जमान्यातही स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या विद्युत माळांना प्रचंड मागणी आहे. बेळगावमधील महिला कारागिरांनी हस्तकौशल्याने तयार केलेल्या विद्युतमाळा विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. या माळा जास्त मजबूत व टिकाऊ असल्यामुळे सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते माळा खरेदी करत असतात. त्याचबरोबर सजावट करणारेही याच माळांना पसंती देतात. या व्यवसायामुळे स्थानिक कारागिरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.









