जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदेचे लाभ घेण्याचे दिव्यांगांना आवाहन
बेळगाव : जिल्ह्यातील पात्र दिव्यांगांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) विशेष जॉब कार्ड वितरण अभियान 1 ते 15 जुलैपर्यंत होणार आहे. दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. 1995 मधील कायद्यानुसार समान संधी, हक्कांचे रक्षण, दिव्यांगत्व किंवा शरीराचा एखादा भाग दुर्बल असणे, अर्थातच 40 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 10,800 दिव्यांगांनी जॉब कार्ड मिळविले आहे. यापैकी 2617 दिव्यांगांनी रोहयोमार्फत रोजगार मिळविला आहे.
त्यामुळे सर्व पात्र दिव्यांगांनी जॉब कार्ड मिळविणे गरजेचे आहे. आतापर्यंत अनेक दिव्यांग कुटुंबीयांनी जॉब कार्ड मिळविले असून अशा कुटुंबांनी 1 एप्रिल रोजी विशेष कार्ड मिळवून एका आर्थिक वर्षात 100 दिवस काम मिळवणे शक्य होणार आहे. सदर कुटुंबांना एकूण कामाच्या प्रमाणात 50 टक्के सवलत मिळणार आहे. दिव्यांगांना आर्थिक बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. मधून अभियान होणार असून अधिक माहितीसाठी आपल्या ग्रा. पं.शी संपर्क साधावा किंवा रोहयो साहाय्यवाणी 8073109488 अथवा 8277506000 वर संपर्क साधावा, असे आवाहन जि. पं. सीईओ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
विशेष रोजगार कार्ड
रोहयो योजनेंतर्गत ग्रामीण पात्र कुटुंबांना एका सामान्य रोजगार कार्डद्वारे 10 दिवसांचे काम देण्यात येत आहे. मात्र विशेष दिव्यांगांना दुर्बल वर्गातील समजून त्यांना विशेष रोजगार कार्ड देऊन वैयक्तिकपणे 100 दिवसांचे काम मिळणार आहे. हे कार्ड मिळवलेल्यांना रोजगार कार्डद्वारे फक्त त्यांनाच काम करण्याची मुभा असेल, असेही जि. पं. सीईओंनी कळविले आहे.









