गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरण
पणजी : गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी सखोल चौकशीकरिता गोवा सरकारने निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे या संदर्भातील आदेश उच्च शिक्षण खात्याचे अवर सचिव सफल शेट्यो यांनी जाहीर केला आहे. गोवा विद्यापीठातील प्रश्नपत्रिका कथित चोरी प्रकरणी अनेक माध्यमातून आवाज उठल्यानंतर गोवा सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन उच्च शिक्षण खात्यातर्फे एक आदेश जारी केला आणि त्यात माजी न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त डीआयजी बॉस्को जॉर्ज, गोवा विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉक्टर राधिका नायक तसेच व्ही. एम. साळगावकर कॉलेजचे प्रोफेसर एम. आर. के. प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. श्री. प्रसाद हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. उच्च शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी या चौकशी समितीला आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेशात म्हटले आहे. राज्यपालांनी कुलगुरुंकडे या प्रकरणाचा अहवाल मागितला होता. सदर अहवाल राज्यपालांना बुधवारी सादर करण्यात आला. या अहवालामध्ये या प्रकरणात काहीही सापडलेले नाही, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गुऊवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर एका निर्णयाद्वारे वरील आदेश जारी केला आणि चौकशी समिती स्थापन केली.








