15 व्या वित्त आयोगातून पॅकेज : महापालिका आयुक्त शुभा बी. यांची माहिती
बेळगाव : महानगरपालिकेला सरकारच्या 15 व्या वित्त आयोगातून 18 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळाले आहे. या अनुदानातून शहरातील 58 प्रभागांमधील विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. जी कामे तात्काळ करणे गरजेची आहेत, त्या कामांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. विकासासाठी निधी कमी पडू नये यासाठी विधानसभा अध्यक्षांना बेळगावच्या मनपाला विशेष अनुदान मंजूर करावे यासाठी भेटणे गरजेचे आहे, असे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी नगरसेवकांशी संवाद साधताना सांगितले. शहरातील पाणीपुरवठा समस्येबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैठकीला अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली.
त्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर नगरसेवकांशी संवाद साधला. बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअॅण्डटी कंपनीकडे सोपविताना 200 कोटी रुपयांचा करार झाला होता. त्यापैकी 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम देणे बाकी असल्याने कदाचित एलअॅण्डटीकडून काम पूर्ण करण्यास चालढकल केली जात आहे. महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प 80 कोटींचा असून त्यातून एलअॅण्डटी कंपनीची रक्कम देणे शक्य नाही. त्यामुळे मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी खुल्या जागा भाडेकरार तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. उर्वरित एलअॅण्डटीची रक्कम कशी द्यावी, यावर विचारविनिमय करणे गरजेचे आहे. मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी भूभाडे वाढवावे का? याबाबतही विचार व्हावा.
एप्रिलमध्ये नगरसेवकांचा अभ्यासदौरा
ज्या महानगरपालिका करवसुलीत आघाडीवर आहेत, तशा शहरांचा अभ्यास करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नगरसेवकांचा अभ्यासदौरा करणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्या शहरांची निवड करण्यात यावी, याबाबत महानगरपालिकेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर नगरसेवकांनी आपली मते कळवावीत. या दौऱ्यासाठी सरकारचा निधी मिळणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
15 व्या वित्त आयोगातून बेळगाव महापालिकेला 18 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळाले आहे. त्यासाठी नगरसेवकांनी प्रभागात विकासकामे राबविताना आपल्या निधीसह 15 व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करावा, असे सांगितले. सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाचा विशेष निधी मिळवायचा असल्यास महापालिकेचा महसूल वाढणे गरजेचे आहे. यंदा चांगल्या प्रकारे महसूल गाठण्यात यश आल्याने सरकारने हा निधी मंजूर केला आहे.
बेळगावसाठी विशेष अनुदान मंजूर करण्याची गरज
दरवर्षी बेळगावात भरविल्या जाणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी महापालिकेच्या निधीतून लाखो रुपये खर्च केले जातात. त्यामुळे विकासकामे राबविताना निधीची कमतरता भासत आहे, असे नगरसेवकांनी सांगितले. त्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, राज्य सरकारचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला असला तरी पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करता येऊ शकते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन बेळगावसाठी विशेष अनुदान मंजूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.









