बेळगाव : स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झालेल्या बेळगावच्या पाच हॉकीपटूंचा जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी खास सत्कार केला. हॉकी बेळगाव संघटनेकडे सराव करीत असलेल्या चार महिला हॉकीपटूंचा म्हैसूर येथील युवजन क्रीडा खात्याच्या हॉकी हॉस्टेलमध्ये निवड झाली असून त्यामध्ये आएशा शेख, साक्षी चौगुले, साक्षी पाटील, मयुरी कंग्राळकर तर बळ्ळारी येथील युथ स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी प्रवीण जक्कन्नावर याची निवड झाली आहे. या पाचही हॉकीपटूंचा प्रशिक्षक कॅप्टन उत्तम शिंदे, सुधाकर चाळके यांचा बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, संघटनेचे अध्यक्ष गुलाप्पा होसमनी यांच हस्ते खास सत्कार करण्यात आला. दसरा क्रीडा स्पर्धेत या मुलींच्या संघाने सतत दुसरा किंवा तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
त्यामुळे पुन्हा बेळगावचे हॉकीचे वैभव प्राप्त होऊ लागले आहे. आएशा शेख, साक्षी चौगुले, साक्षी पाटील व मयुरी कंग्राळकर या महिला खेळाडूंनी बळ्ळारी येथे झालेल्या निवड चाचणीत आपला सहभाग घेतला होता. त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेवून वरील खेळाडूंची स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड करण्यात आली आहे. वरील सर्व खेळाडूंना त्यांचे शिक्षण व हॉकी प्रशिक्षण मोफत असून संबंधित सर्व खर्च सरकार उचलणार आहे. निवड झालेल्या महिला हॉकीपटूंपैकी मयुरी कंग्राळकर, साक्षी पाटील, साक्षी चौगुले या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. तर मयुरी ही खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रहिवासी असून साक्षी पाटील ही असोगा येथे वास्तव्यास आहे. मुलांमध्ये निवड झालेला प्रवीण जक्कन्नावर हा एम. आर. भंडारी स्कूलचा विद्यार्थी आहेत.









