वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या विरोधात छेडछाडीचे आरोप केले आहेत. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी 1500 पानी आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी आता विशेष न्यायालयात 27 जून रोजी सुनावणी होणार आहे. लैंगिक शोषणाप्रकरणी बृजभूषण सिंह विरोधातील आरोपपत्र एमपी/एमएलए न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले आहे. न्यायाधीश हरजीत सिंह जसपाल यांच्यासमोर बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दाखल आरोपपत्राप्रकरणी सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी 6 महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींवर आरोपपत्र दाखल केले आहे. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत निदर्शने केली होती. यानंतर बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पीडितांचे जबाब नोंदवून घेत सुमारे 1500 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
पॉक्सो प्रकरणी दिलासा
खासदार बृजभूषण यांच्याविरोधात एका अल्पवयीन कुस्तीपटूने देखील तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. परंतु काही दिवसांपूर्वी संबंधित अल्पवयीन कुस्तीपटूने स्वत:चा आरोप मागे घेतला. यामुळे दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटू आणि तिच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेत न्यायालयात अंतिम अहवाल दाखल केला. या अहवालाद्वारे बृजभूषण यांना पॉक्सो प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे.









