धोका टाळण्यासाठी सर्व जनावरांना लसीकरण करून घेणे आवश्यक : सहकार्य करण्याचे आवाहन
बेळगाव : लाळ्या खुरकत रोगाच्या निर्मूलनासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. 4 महिन्यांवरील सर्व जनावरांना घरोघरी जाऊन लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी पशुसंगोपन खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात 13,93,711 मोठी जनावरे आहेत. यामध्ये बैल, गाय, म्हैस आणि त्यांच्या वासरांचा समावेश आहे. या सर्व जनावरांना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. हे लसीकरण जनावरांच्या गोठ्यावर जाऊन मोफत दिले जाणार आहे. लाळ्या खुरकत रोगांची लागण झाल्यास जनावरांच्या तोंड व पायांना जखमा होऊन जनावर अशक्त बनते. रोगाची तीव्रता वाढल्यास दगावण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून खात्याकडून लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली असते.
खबरदारी म्हणून वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण
मागील दोन वर्षात जनावरांना लम्पी आणि इतर रोगांची लागण झाली होती. पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यासाठी खबरदारी म्हणून वेळोवेळी प्रतिबंधक लसीकरण राबविले जात आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आवश्यक लसीकरणाचा पुरवठा करण्यात आला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, पशुसखीच्या माध्यमातून मोहीम यशस्वी केली जाणार आहे.
लसीकरणाबाबत गैरसमज
लम्पी किंवा लाळ्या खुरकत लसीकरण करून घेतल्यानंतर जनावरांची दूध क्षमता कमी होऊन जनावरे आजारी पडतात, असा पशुपालकांमध्ये गैरसमज आहे. काही पशुपालक लसीकरण करून घेण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे. मात्र पुढील रोगाचा धोका टाळण्यासाठी सर्व जनावरांना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.









