बेळगाव : वायव्य परिवहन मंडळाने पर्यटनासाठी विशेष बसेसची सोय केली आहे. धबधबे, मंदिरे व प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी एक दिवसाची पॅकेज टूर जाहीर केली आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी व प्रत्येक रविवारी यात्रास्थळांना विशेष वाहने धावणार आहेत. बेळगावपासून हिडकल डॅम, गोडचिनमलकी, गोकाक धबधबा व बेळगावपासून नांगरतास, आंबोली, बेळगाव ते कोल्हापूर महालक्ष्मी व कणेरी मठला जाण्यासाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच बेळगावहून कक्केरी, दांडेली, कुळगी नेचरपार्कला जाण्यासाठीही एक स्वतंत्र बस धावणार आहे. यासाठी मल्टीएक्सेल, व्होल्वो व एक्स्प्रेस बसची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवासाला या बसमध्ये संधी मिळणार नाही, असे परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
बेळगाव ते राजहंसगड, मिलिटरी महादेव, भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालय, हुणसेवारी येथील रेवणसिद्धेश्वर मंदिर, निलजी येथील अलौकिक ध्यानमंदिराला जाण्यासाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. याबरोबरच बेळगावपासून एम. के. हुबळीजवळील गंगाम्बिका ऐक्य स्थळ, श्री अश्वत्थ लक्ष्मीनरसिंह स्वामी देवस्थान, कित्तूर किल्ला, सोगल सोमनाथ देवस्थान, नविलतीर्थ धरणचा एका दिवसात प्रवास आयोजित करण्यात आला आहे. बेळगावपासून राजहंसगड, बेळगुंदी येथील विश्रांतआश्रम, राकसकोप धरण, धामणे एस. फॉल्स, वैजनाथ देवस्थान, बेळगावपासून गोडची वीरभद्र देवस्थान, बदामी, बनशंकरी देवस्थान, शिवयोग मंदिर व बेळगावपासून राजहंसगड, असोगा, नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा समाधी, हलशी भू-वराह श्री लक्ष्मीनरसिंह देवस्थान, कक्केरी येथील श्री बीष्टादेवी मंदिराला जाण्यासाठी एक दिवसाचा प्रवास ठरविण्यात आला आहे.









