भक्तांच्या संख्येत वाढ : नवरात्रोत्सव काळात गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बस
बेळगाव : नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती-यल्लम्मा व वाडीरत्नागिरी जोतिबाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी परिवहनने विशेष यात्रा बस सुरू केली आहे. सोमवारी सौंदत्ती यल्लम्मासाठी 50 तर वाडीरत्नागिरी जोतिबासाठी 7 बस धावल्या. या पार्श्वभूमीवर परिवहनचे विभागीय नियंत्रण अधिकारी गणेश राठोड, डीटीओ के. के. लमाणी, डेपो मॅनेंजर ए. वाय. शिरगुप्पीकर यांनी जोतिबा विशेष बससेवेला चालना दिली. नवरात्रोत्सव काळात बेळगाव-सौंदती आणि बेळगाव जोतिबा मार्गावर अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास करणे सोयिस्कर होवू लागले आहे. बेळगाव-जोतिबा तिकीट दर 200 रुपये तर हाफ तिकीट 100 रुपये आकारले जात आहेत. तर बेळगाव सौंदत्ती 120 रुपये व हाफ तिकीट 60 रुपये आकारले जात आहेत.
नवरात्रोत्सव काळात जोतिबा आणि सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. बेळगाव, चंदगड, संकेश्वर, गडहिंग्लज, खानापूर आदी ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. यासाठी नवरात्रोत्सव काळात जादा बससेवा पुरविण्यात आली आहे. बेळगाव बसस्थानकातून दररोज 70 हून अधिक बसेस धावू लागल्या आहेत. यात्रा, जत्रा आणि दसऱ्याच्या सुटीमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकदेखील गजबजू लागले आहे. विविध ठिकाणी प्रवास करणारे प्रवाशी अधिक दिसून येत आहेत. यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. महिलांचा मोफत प्रवास सुरू असल्याने बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. लहान मुलांसह सौंदत्ती यल्लम्मा आणि जोतिबाकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. परिवहनने सौंदत्ती आणि जोतिबा देव दर्शनासाठी विशेष बससेवा उपलब्ध केली आहे. दरम्यान, या बससेवेची पाहणी करण्यासाठी परिवहनचे अधिकारी सोमवारी बसस्थानकात दाखल झाले होते. उपलब्ध बस, बसचालक, वाहक यांची माहिती घेऊन सुरळीत बससेवा सुरू ठेवण्याबाबत सूचना केल्या. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.









