किम् कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिन: अकुलीनो पि विद्यावान् देवैरपि सुपूज्यते
अर्थ : ज्ञानहीन, विद्याहीन अशी व्यक्ती, उच्च कुळात जन्मलेली असूनही काय फायदा? ज्ञानी व्यक्ती उच्च कुळात जन्मलेली नसूनही, तिची देवसुद्धा पूजा करतात.
आमचा भारत देश अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इतर देशांचे जन्म किंवा तिथल्या धर्माचे जन्म पाहिले तर तिथे कोणालातरी स्वप्नात येऊन संदेश दिल्यानंतर जन्माला आलेत पण आमच्या इथे मात्र प्रत्यक्ष भगवंतांनीच जन्म घेतल्याचे किंवा भगवंताचे अंश जन्माला आल्याची उदाहरणं आम्हाला दिसतात. त्याच्यामागचं कारण हे आहे की अशी गरीबीमधली परंतु सर्व गुणांनी श्रेष्ठ असलेली माणसं भक्तीच्या रूपात या देशात उभी आहेत. म्हणूनच इथे वारंवार देवत्वाची प्रचिती येते. सध्या आपण राजकारणात जे चाललंय ते पाहतोय. एखाद्या मोठ्या राजघराण्यातला मुलगा किंवा त्याचा वारस कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी प्रत्येकजण चढाओढीने वाट्टेल त्या कथा वाचून सांगत असतात. अशा वेळेला हा श्लोक खूप काही सांगून जातो. कृष्णासारखा कृष्ण साक्षात देव जरी असला तरी त्यांनी समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टींना कसं ओळखायचं याची उदाहरणच घालून दिली आहेत. हस्तीनापुरात आल्यानंतर वैभवसंपन्न असलेल्या धृतराष्ट्राकडे तो कधीच राहिला नाही आणि पांडवांच्याबरोबर काम करत असताना राहायची वेळ आली तर तो विदुराकडे राहत असे. याचं कारणच असं की हे लोक जरी पैशाने लहान असले किंवा गरीब असले तरीही ते तत्त्वनिष्ठ होते. संस्कारी आणि भगवंतावर भक्ती करणारे होते. म्हणूनच देवाला अशा लोकांकडे राहणं किंवा अशा लोकांचा सन्मान करणं जास्त आवडतं. कृष्णाच्याच काळातली घडलेली घटना म्हणजे कृष्णाचा मित्र सुदामा. या सुदाम्याला अतिशय दारिद्र्या असलं, गरिबी असली तरी आपल्या मैत्रीमध्ये कुठेही अंतर पडू न देता आणि त्याला कुठलेही उपकाराचं ओझे न होता त्याला अप्रत्यक्षपणे देणारा श्रीकृष्ण हा भगवंत होता. म्हणूनच हे सुभाषित वाचल्यानंतर आत्ताच्या जगातले श्रीमंत घरातले अतीज्ञान घेतलेले पण संस्कारहीन लोक पाहिले की वाटतं गरीब घरातले लोक बरे निदान ते माणुसकीने तरी वागतात. मध्यंतरी एका ठिकाणी रस्त्यावर रहदारीमुळे गाडी थांबली होती. गाडीत अतिशय श्रीमंत माणूस बसला होता आणि त्या माणसाला खूप उकडायला लागलं म्हणून त्यांनी त्याच्या गाडीच्या काचा उघडल्या. त्याबरोबर त्याला रस्त्यावर चुलीवरती भाकरी करण्याचा वास आला. तो वास आल्यानंतर त्याच्या पोटामध्ये भूक जागी झाली आणि सहज डोकावून पाहू लागला. दुपारची भुकेची वेळ लक्षात घेऊन तो बघत असलेला पाहून त्या गरीब बाईने दोन भाकरी कागदात बांधून पटकन त्या श्रीमंत माणसाला दिल्या. त्यांनी खिशातून पैसे काढून देऊ केले. त्यावेळेला तिने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. भाकरीचे कधी पैसे घेऊ नयेत आणि भुकेच्या वेळेला तर नाहीच नाही. त्यावेळेला त्या माणसाला ती बाई जगातली श्रीमंत व्यक्ती वाटायला लागली. हे पाहिल्यानंतर अशावेळी तिथे देवच उभा आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणूनच ज्ञान नसलं तरी चालेल पैसा नसला तरी चालेल पण माणुसकीचा संस्कार हवा, हेच यातून स्पष्ट होतं.








