यदिच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा ।
परापवादशास्त्रsभ्यो गां चरन्तीं निवारय?
सरलार्थ- जर एकाच कृत्याने संपूर्ण जगाला वश करु इच्छित असशील तर दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या आपल्या वाणीला वश करणे आवश्यक आहे.
लहानपणापासून जेव्हा आम्हाला बोलता येत नसतं तेव्हापासून आम्ही स्वत:कडे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आम्ही सतत स्वत:ला प्रुव्ह करत असतो पण मात्र करत नाही. समाजामध्ये असं टू प्रूव्ह करणारे लोकं केव्हापासून जन्माला आलेत माहिती नाही परंतु जसजसं दुसऱ्यापेक्षा आपण चांगले आहोत हे दाखवणे माणसाला जमायला लागलं तेव्हापासून ही संकल्पना अस्तित्वात आली असावी. आपण प्रत्येकक्षणी नेहमी दुसऱ्याबद्दल बोलत असतो. आपण कसे आदर्श आहोत याचा प्रत्यय दुसऱ्यांना देत असतो पण तो देत असताना दुसऱ्याशी तुलना करत असतो. म्हणजेच आम्ही दुसऱ्याच्या तुलनेत जगत असतो. यामुळे दुसऱ्याबद्दल सतत वाईट बोलणं हा आम्हाला जन्मसिद्ध हक्क मिळालेला असतो. लहानपणी भोकाड पसरून सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना आईला कामातून खेचून आणतो. इतरांना वाटतं, काय ही आई मुलाला रडवत ठेवून खुशाल काम करते. म्हणजे आईला कशी बोलणी बसतील किंवा आईला कसं वाईट ठरवलं जाईल याचाच प्रयत्न आम्ही जन्मत: करत असतो. हीच गोष्ट मोठेपणीसुद्धा दिसायला लागते. माझी आई, मावशी एकत्र आल्या की त्या तिसऱ्या बहिणीबद्दल किंवा तिसऱ्या मावशीबद्दल बोलत असतात किंवा आत्याबद्दल त्यांच्या सासवांबद्दल त्या कधीही स्वत:बद्दल बोलताना मी ऐकलं नाही. शाळेत जायला लागल्यानंतर वर्गात देखील तेच घडायचं. वर्गात शेजारी बसलेला मुलगा उठून गेला की त्याच्याबद्दल गप्पा मारणे सुरू परंतु स्वत:बद्दल किंवा चांगल्या एखाद्या गोष्टीबद्दल आम्ही कधीच चर्चा करत नाही, ही गोष्ट आमच्या लक्षात आली. थोडं मोठं झाल्यानंतर शेजारीपाजारी, नातेवाईक किंवा अगदी राजकारणी किंवा जगातले कोणीही लोक याबद्दल आम्ही सर्रास बोलत असतो. अगदी आजच्या काळात बोलायचं झालं तर ज्या माणसाला स्वत:चं घर चालवता येत नाही तो मोदींबद्दल छातीठोकपणे वाटेल ते बोलत असतो. ही जी दुसऱ्याची निंदा करण्याची सवय आम्हाला जन्मत:च लागलेली असते, त्याचा परिणाम आम्हाला या ठिकाणी दिसतो. खरंतर आम्ही स्वत:ला न्यायाधीश समजत असतो आणि कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींबाबत आम्ही सहज निर्णय देऊन मोकळे होतो. अशा वेळेला आम्ही स्वत: वकील व्हायला हवं. परंतु ते घडत नाही. दुसऱ्याला नाव ठेवताना आपण जास्तीत जास्त रंजक आणि स्वत:कडे चांगलं येईल या दृष्टिकोनातून सतत बोलत असतो. हा उद्योग जगात सगळीकडे चाललेला दिसतो. सध्या तर काय व्हॉट्सअपमुळे या गोष्टींना मोठाच प्रतिसाद मिळतोय. व्हॉट्सअपवर आलेल्या गोष्टी इकडच्या घेऊन तिकडे दुसऱ्याला स्वत:ची प्रतिक्रिया न सांगता कळवणं हा एक धंदा होऊन बसलाय. अशावेळी आपलं नाव न घालता दुसऱ्याला कसं सुनावलं, या आनंदात आपण प्रत्येक क्षण घालवत असतो. आपल्याकडून कुणाकडे कुणाला आनंद निर्माण होईल अशी पोस्ट फार क्वचितवेळा जाते. यातूनच आपलं व्यक्तिमत्व दिसतं आणि म्हणूनच आपली वाणी किंवा बोलणं किंवा बोलण्यापेक्षा आमच्या मनातले विचार अप्रत्यक्षरीत्या दुसरीकडे पोहोचवणं ही एक प्रकारची निंदाच आहे आणि अशी निंदा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा मित्र गवसत नाही.








