पणजी : गेले 15 दिवस चाललेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनाचा काल शुक्रवारी समारोप झाला. सभापती रमेश तवडकर यांनी त्याचा थोडक्यात आढावा घेऊन अधिवेशनाचा समारोप केला. विधानसभा अनिश्चित काळासाठी संस्थगित केली. तसेच सर्व आमदार, मंत्री, विधानसभेतील कर्मचारी, अधिकारी, पोलिस तसेच पत्रकार अशा सर्व संबंधितांचे सभापतींनी आभार मानले. विविध विषयांवरील तारांकित-अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, सरकारी-खासगी ठराव, शून्य तासातील अनेक विषय यांची त्यांनी माहिती दिली. हे अधिवेशन 21 जुलैपासून सुरू झाले होते.
अधिवेशनात 15 बैठका झाल्या. गोव्याच्या लोककल्याणासंदर्भात संशोधन केल्याबद्दल सदस्यांचे सभापतींनी कौतुक केले. अधिवेशनात 896 तारांकीत, 3 हजार 330 अतारांकीत असे एकूण 4 हजार 226 प्रश्न व सूचना आल्या. 896 प्रश्न स्वीकारले, तर 75 तोंडी उत्तरे दिली. 821 तारांकीत आणि 3 हजार 330 अतारांकीत प्रश्नांनी उत्तरे पटलावर ठेवण्यात आली, 2 तारांकीत आणि 2 अतारांकीत प्रश्न पुढील अधिवेशनात ठेवण्यात आले, असे सभापती म्हणाले. कामकाज सल्लागार समितीचा 2025 चा अहवाल मान्य करण्यात आला. 26 शोक प्रस्ताव, 35 अभिनंदानाचे ठराव एकमताने संमत करण्यात आले.
अधिवेशनात 780 कागदपत्रे सभागृहापुढे आली. 180 शून्य प्रहारात 30 लक्षवेधी सूचना चर्चेत आल्या. 21 व 23 जुलै रोजी 2025-26 वर अर्थसंकल्पावर चर्चा झाली, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. अनुदानीत पुरवण्या विचाविनिमय करून मान्य करण्यात आल्या. गोवा विनियोग 2025 सभागृहात मांडले. त्याशिवाय 11 विधेयकास राज्यपालांनी मंजूर दिली. सरकारी 18 विधेयके सभागृहासमोर मांडून विचारात घेण्यात आली. सदस्यांकडून 15 खासगी प्रस्ताव चर्चा करून सरकारकडून योग्य आश्वासनाची अनुमती घेतली. 14 प्रस्ताव मागे आणि 1 स्वीकारला. अधिवेशनात 260 विद्यालये आणि महाविद्यालयांच्या 12 हजार विद्यार्थ्यां व 385 शिक्षक-शिक्षकांनी कामकाज पाहिले, असेही सभापती म्हणाले.









