प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तव:।
तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रत:
सरलार्थ-आवडणारे बोलणे ऐकून सर्वच लोक खुश होतात म्हणून फक्त तसेच बोलावे, बोलण्यामध्ये दारिद्र्या (किंवा चिक्कुपणा) कशाला? बोलायला कांही पैसे पडत नाहीत, तेंव्हा ऐकणाऱ्याला आनंद होईल असे चांगले अघळपघळ बोलावे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कोणत्या गोष्टीने फरक पडत असेल तर तो आपल्या बोलण्याने. तुमचं वागणं कसं आहे, तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय काम करता यापेक्षाही तुम्ही कसे बोलता याला तुमच्या आयुष्यात फार मोठे महत्त्व असते. रस्त्यावरचा भिकारी मी आंधळा आहे म्हणून नुसती भीक मागत बसला त्यापेक्षा त्याच्यासमोर कोणीतरी पाटी लिहीली की ‘आजचा सुंदर दिवस बघण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल आणि तुमच्यामुळे मलाही तो आनंद मिळतोय’ या एवढ्याशा वाक्याने अनेक लोक ती पाटी वाचून त्या भिकाऱ्याला मदत करायला पुढे येतात. म्हणजे एका वाक्याने, एका बोलण्याने किंवा एका संदेशाने, कितीतरी गोष्टी बदलून जातात.
असंच बोलणं अनेक संतांचं अनेक थोरामोठ्यांचं किंवा जे जे ईश्वरी अंश होते त्यांच्याहीबाबतीत आपल्या लक्षात येतं. प्रभू रामचंद्रांना वनवास झाल्यानंतर खरंतर त्यांनी काहीतरी वेडेवाकडे बोलण्याने प्रत्युत्तर करणे किंवा चिडचिड करणे, रागावणे अपेक्षित होतं. परंतु मुळातच ईश्वराचा अंश असलेले श्रीराम काहीही न बोलता पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या आईच्या भेटीला गेले. त्यावेळी आईदेखील अतिशय उद्विग्न झालेली होती. चांगले बोलण्याचा संस्कार तिथे जाणवतो. काहीही वेडेवाकडे न बोलता तिने रामाला फक्त विचारलं हे काय झालं रामा? तेव्हा रामाने समजावले, सांगितलं, की आई अगं मला काल अयोध्येचं राज्य दिलं होतं म्हणून सगळ्यांना आनंद झाला. पण आज मला वनवासाचे राज्य दिले म्हणजे जंगलाचे राज्य दिले म्हणून दु:ख कशाला करायचं? जंगलदेखील तोही आपल्या राज्याचाच भाग आहे ना? म्हणजे रामाच्या बोलण्याने, स्वीकारण्याने अनेक गोष्टींना वेगळे अर्थ प्राप्त झाले. कैकयीलासुद्धा राम वेडेवाकडे न बोलता तिला तिच्यातले चांगल्या गुणांची आठवण करून देतो. म्हणून रामसुद्धा सत्य वचनी मानला जातो. असं वचन किंवा वाक्य किंवा बोलणं त्यांचं सुंदर आहे ती माणसं आयुष्यामध्ये खूप काही करून जातात.
महाभारतातील प्रसंगांमध्येसुद्धा नरोबा कुंजरोवा असं म्हणून कोणतेही चुकीचे वाक्य न बोलता नेमका परिणाम साधला जातो. अशी वाक्य आम्हाला आयुष्यात बोलता आलीच पाहिजेत. म्हणून चांगलं बोलणं हा आपला एक चांगला गुणच आहे. समर्थांनीसुद्धा याबाबतीत अतिशय चांगलं सांगितलंय, की आपण कसं बोललं पाहिजे याचा एक त्यांनी वस्तूपाठच घालून दिला आहे.
असं चांगलं बोलणाऱ्यांसाठी सतत नामस्मरणाचाही मार्ग सांगितला. त्यांनी तुमच्या वाणीला आकार आणि ओज प्राप्त होतं. म्हणूनच दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलता आलं नाही तरी वाईट बोलू नका. वाईट बोलणं टाळता आलं तरी आपल्याला निम्मे अधिक अंतर पार केल्याचे समाधान मिळते. कारण आपण सहजासहजी कुणाबद्दल चांगलं बोलायला जात नाही. कोणत्याही व्यक्तीबद्दल माहिती विचारली तर त्याचे वाईट गुणधर्मच आपण जास्त पटकन सांगतो. हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून अशा वेळेला चांगलं बोलता येतं का? किंवा चांगलं बोलण्याचं वळण आपल्या जिभेला लावणे खूप गरजेचे आहे. पैसे खर्च न करता जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी गोष्ट म्हणजे आपलं उत्तम बोलणं हे लक्षात ठेवायला हवं.








