सिमेंटचे जंगल-मोबाईल टॉवर कारणीभूत : पुनर्वसनासाठी जाणीवपूर्वक्aाढ प्रयत्न
मनीषा सुभेदार /बेळगाव
‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या’, ‘चिव चिव चिमणी छतात’, ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ अशा एक ना अनेक गीतांतून आपल्याकडे चिमणीचा उल्लेख सतत आढळतो. मात्र, आता केवळ गीतांमध्येच चिमण्यांचे अस्तित्व सीमित न राहता प्रत्यक्षात त्यांची संख्या वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज जागतिक ‘चिमणी दिवस’. एखाद्या व्यक्तीचे, पक्ष्याचे, घटनेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या नावे एखादा विशेष दिवस जाहीर केला जातो. वास्तविक चिमणीसारखा अत्यंत छोटा पक्षी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच तर ‘स्पॅरो डे’ म्हणजेच ‘चिमणी दिवस’ जाहीर करावा लागला आहे. ‘द नेचर फॉर सोसायटी ऑफ इंडियन एन्व्हिरॉन्मेंट’चे संयोजक मोहम्मद दिलावर यांनी 20 मार्च हा दिवस ‘चिमणी दिन’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी मांडली आणि ती मान्य झाली. चिमण्यांचे अस्तित्व निसर्गचक्रामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. चिमण्या कीटक आणि अळ्या खातात आणि त्यामुळे धान्याची नासाडी वाचते. परंतु, चिमण्यांमुळेच धान्याची नासाडी होते, असे मानत चीनमध्ये मध्यंतरी चिमण्या मारण्यास प्रारंभ झाला. परिणामी टोळधाड वाढली आणि चीनला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला. भारतीय मन हे नेहमी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असते. म्हणून तर येथे माती, पाणी, वृक्ष, वायु यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. भारतीयांना चिमण्यांचे महत्त्व पूर्वापारच माहीत असल्याने कदाचित वेगवेगळ्या गीतांमधूनही त्यांचे अस्तित्व सतत अधोरेखित करण्यात आले.
मानवाचे नैसर्गिक अधिवासावर आक्रमण
मात्र, आज चिमण्यांची संख्या कमालीची घटत आहे. लॉकडाऊन काळात चिमण्या आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली, याचा अर्थ त्यांना अपेक्षित असा निवांतपणा या काळात मिळाला. म्हणजेच औद्योगिकीकरण, मानवाचे नैसर्गिक अधिवासावर आक्रमण हे चिमण्यांची संख्या रोडावण्यास कारणीभूत ठरले. जगभरात एकूण 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. भारतात चिमण्यांच्या सहा प्रजाती आढळतात. बेळगावमध्येच साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी चिमण्यांचा चिवचिवाट सातत्याने ऐकू येत असे. नानावाडी येथे राहणाऱ्या जयप्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी दररोज शंभर-सव्वाशे चिमण्यांसाठी दाणापाणी ठेवत. दररोज दुपारी चारच्या दरम्यान त्यांच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळत असे. मात्र, जसे सिमेंटचे आणि मोबाईल टॉवरचे जंगल उभे राहिले तशी चिमण्यांची संख्या रोडावत चालली. आज केवळ 2-3 चिमण्या त्यांच्या घराच्या परिसरात चिवचिवताना दिसतात. चिमण्यांच्या संख्येत घट होण्याचे मुख्य कारण मोबाईल टॉवर व रेडिएशनवर आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संस्थेने धोकादायक श्रेणींमध्ये रेड डाटा लिस्ट काढली आहे. संस्थेने सतत एक तास विद्युत चुंबकीय उत्सर्जनाचा मारा केल्यानंतर चिमणीचे गर्भ नष्ट झाले, असे आढळून आले. आता आपण तंत्रज्ञान विकसित केले तरी त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व संपवणार आहोत का? हा विचार करायला हवा.
आपल्या मुलांना चिमण्यांची उपमा
निसर्गचक्रामध्ये कोणताच घटक गौण नाही आणि प्राणी-पक्षी तर महत्त्वाचे आहेत. दूर गेलेल्या आपल्या पिलांना चिमण्यांची उपमा देऊन आई त्यांना माघारी बोलावते. म्हणजेच आपल्या मुलांना चिमण्यांची उपमा गदिमांनी दिलेली आहे. आपल्या मुलांचे अस्तित्व महत्त्वाचे तसेच निसर्गचक्राची साखळी अखंड राहण्यासाठी चिमण्यांचे अस्तित्वही महत्त्वाचे आहे.
जाणीवपूर्वक-सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक

चिमण्यांना अडगळीची जागा तसेच कौलारू घरे आवडतात. शहरात अशा जागा उपलब्धच नाहीत. त्यामुळे शहरांमधून चिमण्या जवळजवळ हद्दपार झाल्या आहेत. परंतु, सुदैवाने बेळगाव तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये वळचणीची, कौलारू घरे आजही आहेत. त्यामुळे धामणे, येळ्ळूरसह अनेक खेड्यांमध्ये चिमण्यांची संख्या वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे. आजही अनेक खेड्यांमध्ये चिमण्यांसाठी दाणापाण्याची सोय करण्याचा प्रघात आहे. एका चिमणीचे आयुष्य साधारण 3 ते 4 वर्षे असते. त्या अळी आणि किडे खाऊन एकप्रकारे पिकांचे संरक्षण करत असतात. त्यांच्या विणीच्या कालावधीत त्यांना मानवाचा संपर्क किंवा हस्तक्षेप आवडत नाही. टॉवरमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. तथापि, आता आपण उंचीच्या जागेवर स्पॅरो नेस्ट उभे केले तर हळूहळू चिमण्या त्याकडे वळतील आणि त्यांची संख्याही वाढेल. मात्र, त्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहे.
– निरंजन संत- नामवंत पक्षीतज्ञ
त्यांची हमखास आठवण येते

प्राणी-पक्षी यांच्याबद्दल मला विशेष प्रेम आहे. त्यामुळे माझ्या घराच्या अंगणात मी चिमण्यांसाठी पाणी आणि दाणा आवर्जून ठेवत होतो. एक काळ होता, साधारण 100 ते 125 चिमण्या दररोज चिवचिवाट करत आनंदाने बागडत होत्या. या परिसरात वसाहत वाढली, सिमेंटची घरे उभी राहिली, मोबाईल टॉवर आले आणि चिमण्या कमी झाल्या. परंतु, आजही दररोज दुपारी 4 वाजता मला त्यांची हमखास आठवण येतेच. आता घराच्या मागच्या बाजूला 2-4 चिमण्या चिवचिवाट करताना दिसतात. त्यांनी दररोज यावे यासाठी त्यांच्यासाठीसुद्धा दाणापाणी ठेवत आहे. आपण सर्वांनीच त्यांच्यासाठी स्वतंत्र घरटे तयार करून त्या घरट्यात परत येतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– कमल व जयप्रकाश पाटील, नानावाडी









