माद्रीद/ वृत्तसंस्था
स्पेनची आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला टेनिसपटू 30 वर्षीय गार्बेनी मुगुरूझाने शनिवारी येथे पत्रकार परिषदेत आपल्या टेनिस कारकिर्दीतील निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
मुगुरूझाने आपल्या तब्बल 10 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीमध्ये दोन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली. तर 2017 साली तिने डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत तब्बल चार आठवडे अग्रस्थान राखले होते. 2023 च्या जानेवारीमध्ये तिने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. स्पेनतर्फे टेनिस क्षेत्रात प्रसिद्धी मिळविणारी अरांत्झा सांचेझनंतर मुगुरूझा ही दुसरी महिला टेनिसपटू आहे. मुगुरूझाने आपल्या टेनिस कारकिर्दीत अमेरिकेच्या व्हिनस आणि सेरेना विलियम्स भगिनींचा पराभव करण्याचा विक्रम केला होता. अलिकडेच मुगुरूझाची विश्व स्पोर्टस् अकादमीच्या अॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.









