वृत्तसंस्था/ युमेग (क्रोएशिया)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या युमेग क्लेकोर्ट खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेता स्पेनचा 19 वर्षीय कार्लोस ऍल्कारेझने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना अर्जेंटिनाच्या बॅगनिसचा पराभव केला. 2022 च्या टेनिस हंगामात ऍल्कारेझने आतापर्यंत 7 स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऍल्कारेझने अर्जेंटिनाच्या बॅगनिसवर 6-0, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये मात करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. आता ऍल्कारेझचा उपांत्य फेरीचा सामना इटलीच्या झिपेरीशी होणार आहे. इटलीच्या झिपेरीने उपांत्यपूर्व लढतीत स्पेनच्या मिरालेसवर 7-5, 6-4 अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात द्वितीय मानांकित जेनिक सिनेरने स्पेनच्या रॉबर्टो बायेनाचा 6-4, 7-6(7-5) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. बायेना आणि स्पेनचा ऍगेमिनोनी यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडेल. ऍल्कारेझने उपांत्य लढतीत इटलीच्या झिपेरीचा पराभव केल्यास तर तो एटीपीच्या मानांकनात ग्रिकच्या सिटसिपेसला चौथ्या स्थानावरून खाली खेचेल. बिगर मानांकित ऍगेमिनोनीने इटलीच्या सेचिनॅटोचा 6-2, 6-1 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले आहे.









