वृत्तसंस्था / बर्न (स्वीस)
2025 च्या महिलांच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत विश्वविजेत्या स्पेनने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. स्पेनने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीसचा पराभव केला. आता फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील विजयी संघाबरोबर स्पेनची उपांत्य फेरीत गाठ पडेल.
स्पेन आणि स्वीस यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चुरशीचा झाला. दरम्यान स्पेनच्या आक्रमक आणि वेगवान खेळासमोर स्वीसला अनेकवेळा स्पेनच्या गोलपोस्टपर्यंत मजल मारुनही आपले खाते उघडता आले नाही. स्पेनची आक्रमक फळी तसेच बचावफळी आणि भक्कम गोलरक्षण यांचा योग्य समन्वय असल्याने स्पेनला हा सामना सहज जिंकता आला. या सामन्यात स्पेन संघातील आघाडी फळीत खेळणारी अॅथेना डेल कॅस्टीलोने तसेच क्लॉडीया पिना यांनी प्रत्येकी 1 गोल केला. यजमान स्वीसकडून पूर्वाधार्थ स्पेनला कडवा प्रतिकार झाला. क्लॉडीया पिनाने मध्यंतरापर्यंत किमान तीनवेळा स्वीसच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण स्वीसच्या गोलरक्षकाने स्पेनचे हे हल्ले थोपविल्याने मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला. विद्यमान विश्वविजेत्या स्पेनने 66 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. बदली खेळाडू कॅस्टीलोने स्वीसच्या बचावफळीतील खेळाडूंना हुलकावणी देत शानदार गोल केला. 71 व्या मिनिटाला क्लॉडीया पिनाने स्पेनचा दुसरा गोल नोंदविला. स्वीसने शेवटच्या 15 मिनिटांमध्ये गोल करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. पण त्यांना अपयश आल्याने स्पेनने हा सामना 2-0 असा जिंकून शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. या सामन्यात स्पेनच्या अॅलेसियाने पेनल्टीची संधी गमविली तर स्वीसच्या मार्टिझला दांडगाईचा खेळ केल्याबद्दल पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.









