वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
एफआयएच प्रो लीग हॉकी सामन्यात भारतीय महिलांना रोमांचक ठरलेल्या सामन्यात स्पेनकडून 3-4 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारताला बलजीत कौरने (19 वे मिनिट) आघाडी मिळवून दिली. पण दोनच मिनिटानंतर सोफिया रोगोस्कीने (21 वे मिनिट) स्पेनला बरोबरी साधून दिल्यानंतर याच सत्रात 25 व्या मिनिटाला एस्टेल पेटचेमने गोल नोंदवत स्पेनला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. साक्षी राणाने 38 व्या मिनिटाला गोल करीत बरोबरी साधून दिल्यानंतर या तिसऱ्या सत्रातच रुतुजा दादासो पिसाळने 45 व्या मिनिटाल गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली.
चौथ्या सत्रात स्पेनने मुसंडी मारत दोन गोल नोंदवत भारतावर विजय मिळविला. 49 व्या मिनिटाला एस्टेलने तर 52 व्या मिनिटाला लुसिया जिमेनेझने हे गोल नोंदवले. या सत्रात भारताला मात्र गोल नोंदवता आला नाही. स्पेनने दोन पेनल्टी कॉर्नर्सवर गोल नोंदवले. बलजीत कौरने नोंदवलेला गोल हा वरिष्ठ स्तरावर खेळताना नोंदवलेला पहिलाच गोल आहे. याआधीच्या सामन्यात भारतीय महिलांना इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.









