वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या महिलांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील रविवारच्या अटीतटीच्या सामन्यात स्पेनने बलाढ्या जर्मनीवर 2-1 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळवित पूर्ण गूण वसूल केले.
हा सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला आयना क्रिस्केनने मैदानी गोलवर जर्मनीचे खाते उघडले. जर्मनीला ही आघाडी 14 मिनिटांपर्यंत राखता आली. 15 व्या मिनिटाला सोफिया रोगोस्कीने जर्मनीच्या बचावफळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत मैदानी गोल नोंदवित स्पेनला बरोबरी साधून दिली. या सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत पंचांकडून स्पेनच्या क्लेरा बेडीयाला हिरवे कार्ड दाखविले. या कालावधीत दोन्ही संघांना गोल नोंदविता न आल्याने मध्यंतरावेळी ही लढत 1-1 अशी बरोबरीत होती. तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीला प्रारंभ झाला आणि मोलिनाने स्पेनचा दुसरा गोल केला. या कालावधीत जर्मनीच्या सेगुला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर्सच्या संधी अधिक मिळाल्या. पण स्पेनच्या भक्कम बचावफळीमुळे जर्मनीला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही. या सामन्यातील विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात स्पेनने 6 सामन्यातून 8 गुण मिळविले आहेत. चीनचा महिला संघ 8 सामन्यातून 16 गुणासह आघाडीवर असून विद्यमान विजेता हॉलंड 4 सामन्यातून 9 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 8 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.









