वृत्तसंस्था/ लंडन
युरोपीयन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात गवीच्या निर्णायक एकमेव गोलाच्या जोरावर स्पेनने नॉर्वेचा 1-0 असा पराभव केला. दरम्यान स्पेन आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांनी 2024 साली होणाऱ्या युरो चषक चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेतील आपले तिकीट आरक्षित केले आहे. स्पेन आणि नॉर्वे यांच्यातील झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात 49 व्या मिनिटाला एकमेव निर्णायक गोल स्पेनच्या गवीने केला. आगामी युरोपीयन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धा जर्मनीत घेतली जाणार आहे. 2012 नंतर स्पेन संघाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
पात्र फेरीच्या अन्य एका सामन्यात वेल्सने क्रोएशियाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात हॅरी विलसनने वेल्सचे दोन्ही गोल नोंदविले. या विजयामुळे वेल्सने ड गटातून दुसरे स्थान मिळविले असून क्रोएशिया तिसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी समान 10 गुण घेतले असले तरी सरस गोल सरासरीच्या जोरावर वेल्सने तिसरे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत इ गटातील झालेल्या सामन्यात झेक प्रजासत्ताकने फेरोई आयलंडस्चा 1-0 असा पराभव केला. पोलंड आणि मालडोव्हा यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. रुमानियाने अँडोरावर 4-0 असा एकतर्फी विजय मिळविला.









