वृत्तसंस्था / लॉसेन
2025 साली होणाऱ्या युरोपियन महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नुकताच ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉमध्ये फिफाचा विश्वचषक विजेता स्पेन, इटली, बेल्झीयम आणि पोर्तुगाल यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.
स्पेन महिला संघाने फिफाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. आता हा संघ युरोपियन महिला फुटबॉल चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्याफेब्रुवारी महिन्यात स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने युफाची पहिली नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. 2023 साली सिडनीमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद स्पेनने पटकाविले होते.
2025 ची युरोपियन चॅम्पियनशीप महिलांची फुटबॉल स्पर्धा स्वीत्झर्लंडमध्ये भरविली जाणार आहे. ही स्पर्धा स्वीसमधील बेसील येथे 2 जुलैपासून सुरू होईल. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. स्वीस आणि नॉर्वे यांच्यात सलामीचा सामना होईल. स्वीसमधील आठ शहरांमध्ये सदर स्पर्धा भरविली जाणार असून एकूण 31 सामन्यांचा समावेश राहिल. आतापर्यंत सुमारे 7 लाख तिकीटांची विक्री झाली आहे.









