वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात स्पेनने हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात भारताच्या तुलनेत स्पेनचा खेळ अधिक दर्जेदार झाला.
या सामन्यात पूर्वार्धात भारतीय संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या मात्र 25 व्या मिनिटाला. भारताचे खाते सुखजीत सिंगने उघडले. भारताला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 28 व्या मिनिटाला बोर्जा लाकेलीने स्पेनला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या सामन्यात खेळाच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने सूरज करकेराला मैदानात उतरविले. सुखजीत सिंगने सूरज करकेराच्या दिलेल्या पासवर शानदार गोल केला. 38 व्या मिनिटाला कोबोसने स्पेनचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास 4 मिनिटे बाकी असताना ब्रुनो अॅव्हेलाने स्पेनचा तिसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. भारतीय खेळाडूंना या सामन्यात शेवटच्या सत्रामध्ये पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते वाया गेले. बचाव फळी आणि आघाडी फळी यांच्यात पासेस देताना योग्य ताळमेळ नसल्याने भारताच्या अनेक चढाया स्पेनच्या बचाव फळीने रोखल्या.









