वृत्तसंस्था/ मार्सेली (फ्रान्स)
जुआनलू सांचेझने केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने पाचव्यांदा ऑलिम्पिक पुऊष फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये पाऊल ठेवत विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सांचेझने स्टेड डी मार्सेली येथे 85 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे स्पेनने मोरोक्कोवर 2-1 असा विजय मिळवला. पॅरिस गेम्समध्ये आता अंतिम फेरीत त्यांचा सामना फ्रान्सशी होईल.
मोरोक्कोने मध्यांतराला 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यांचा स्पर्धेतील आघाडीचा स्कोअरर सौफियाने रहिमीने 37 व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केले. पण फर्मिन लोपेझने स्पेनला 65 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर बार्सिलोनाच्या या मिडफिल्डरने जुआनलू सांचेझला त्याचा विजयी गोल करण्यासाठी साहाय्य केले.
1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या स्पेनला तीन वर्षांपूर्वी टोकियो गेम्समध्ये अंतिम फेरीत ब्राझीलकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची भरपाई करण्याची यावेळी त्यांना संधी मिळेल. स्पेनच्या वरिष्ठ संघाने गेल्या महिन्यात युरोपियन चॅम्पियनशिप जिंकलेली असल्याने आधीच हे वर्ष त्यांच्यासाठी आनंदवार्ता आणणारे ठरले आहे. मोरोक्कोसाठी एका मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील हा आणखी एक वेदनादायक पराभव होता. कांस्यपदकासाठी आता गुऊवारी नॅन्टेसमध्ये त्यांचा इजिप्तशी सामना होईल.









