वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूर येथील ईव्ही स्टार्टअप कंपनी अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने इलेक्ट्रिक स्पोर्ट दुचाकी एफ77 ची स्पेस आवृत्ती ही भारतीय बाजारात दाखल केली आहे. कंपनीने दुचाकीची एक्स शोरुम किंमत ही 5.6 लाख रुपये इतकी ठेवली आहे. ही दुचाकी 152 किलोमीटर प्रतितासच्या वेगाने धावणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे.
या मॉडेलचे एफ 77 चे फक्त 10 युनिट्स विकले जाणार आहेत. या गाडीचे बुकिंग हे 22 ऑगस्ट रोजी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या सेगमेंटमध्ये दुचाकीची कोणत्याही अन्य दुचाकीसोबत थेट स्पर्धा राहणार नाही.
दुचाकीची रचना प्रगत तंत्रज्ञान आणि एरोस्पेस यांनी प्रेरित आहे. यामध्ये एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम 7075 चे बनवलेले घटक वापरण्यात आले आहेत.अॅल्युमिनियम 7075 हा एक उच्च शक्तीचा धातू आहे. त्याची ताकद-ते-वजन गुणोत्तर स्टीलपेक्षा हलके आणि मजबूत आहे. ही सामग्री अनेक ठिकाणी विमान संरचना, संरक्षण यंत्रणा, एरोस्पेस आणि लष्करी उद्योगांमध्ये वापरली जाते. याशिवाय पेंट बाइकच्या बॉडीला गरम होण्यापासून वाचवते. अल्ट्राव्हायोलेट एफ 77 स्पेस एडिशनमध्ये प्रगत विमान इलेक्ट्रॉनिक्स आधारित तंत्रेदेखील उपलब्ध असतील. यामध्ये बॅटरीसाठी अनेक फेल-प्रूफ सिस्टम समाविष्ट आहेत.









