सिटी मॅनेंजर्स असोसिएशन-नगर विकास विभागातर्फे मनपामध्ये कार्यशाळा
बेळगाव : सिटी मॅनेंजर्स असोसिएशन, कर्नाटक यांच्यावतीने महापालिकेमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उद्योग करणाऱ्या व्यक्तींना सरकारी जागा दिली जाणार आहे. त्या ठिकाणी 20 वर्षे व्यवसाय करण्यास मुभा देण्यात येणार आहे. 20 वर्षानंतर मात्र ती जागा आणि त्यामध्ये असलेला प्रकल्प किंवा इमारत ही सरकारकडे वर्ग केली जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती देण्यासाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विविध जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील कर्मचारी उपस्थित होते. त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. याचबरोबर नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत कोणकोणते प्रकल्प राबविता येतात याची माहिती देण्यात आली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर ही योजना राबविली जाते. नगर विकास खात्यातर्फे संबंधितांना प्रशिक्षण दिले जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे. फ्रूटमार्केट, मोठे कॉम्प्लेक्स उभे करणे, कचरा विघटन प्रकल्प, आरओप्लॅन्ट यासह इतर व्यवसायांसाठी ही जागा देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी 20 वर्षे आपण व्यवसाय करून त्यामधून उत्पन्न घेऊ शकतो. त्यानंतर मात्र ती जागा तसेच तो प्रकल्प सरकारला हस्तांतर करावा लागणार आहे, अशी माहिती सिटी मॅनेंजर्स असोसिएशनचे समन्वयक डॉ. हरिष एम. यांनी दिली. याचबरोबर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.









