मोहीम अंतराळाची…परीक्षा संयमाची
मनीषा सुभेदार/बेळगाव
कल्पना करा, आपण लिफ्टमध्ये आहोत… अचानक लाईट जाते… बॅकअपची सुविधा नाही… लाईट लवकर येणार नाही… आपली अवस्था काय होईल? यातून बाहेर पडू की नाही? या कल्पनेनेच आपण गलितगात्र होतो. मदतीसाठी हाका मारू लागतो. मग जर फक्त आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर जाऊन तेथेच नऊ महिने अडकून पडणाऱ्या व्यक्तीचे काय झाले असावे? पण या व्यक्ती असामान्य आहेत आणि म्हणूनच त्या आज ‘ग्लोबल हिरो’ म्हणून गणल्या जात आहेत. ही अंतराळ मोहीम सोपी नव्हती. परंतु, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि त्याहीपेक्षा मानसिकदृष्ट्या अत्यंत कणखर असल्याकारणानेच सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर पृथ्वीतलावर परतले आहेत. ही मोहीम नक्की कशी होती? स्पेस स्टेशन कसे होते? मुक्काम लांबला तर काय परिस्थिती उद्भवते, त्याला कसे सामोरे जावे लागते? अशा अनेक प्रश्नांबाबत नासाच्याच खगोलशास्त्रज्ञ डॉ. लीना बोकील यांची ही मुलाखत. विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे त्या बेळगावच्याच आहेत.
►ही अंतराळ मोहीम कशासाठी होती?
नासा व बोईंग स्टारलाईनर यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार बोईंगने यापूर्वी तांत्रिक चाचण्या यानाच्या साहाय्याने केल्या होत्या. परंतु, ही पहिलीच मेडन फ्लाईट (ह्यूमन स्पेस टेस्ट राईड) होती. या दोघांना काही ‘असाईनमेंट’ देण्यात आली नव्हती. परंतु, बोईंग स्टारलाईनरचा हा पहिला प्रयत्न होता. त्यासाठी या दोघांची निवड झाली होती. जूनमध्ये या दोघांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यात आले.
►ही निवड कोणत्या निकषावर होते?
सुनीताची ही तिसरी मोहीम होती. ती भारतीय वंशाची आहे, याचा तर अधिकच आनंद आहे. ती मुख्यत: युएस नेव्ही एव्हीएटर (यु. एस. नेव्हीची पायलट) आहे. म्हणजेच नौदलाला लागणारी विमाने उडवण्याचा तिला अनुभव आहे. ती प्रचंड मेहनती आहे, धाडसी आहे. आता तर तिला आणि बूच यांना मी धाडसी योद्धा असेच म्हणेन. ज्यांना एअरक्राफ्ट उडवता येईल, त्यांनाच स्पेसमध्ये जाण्याची संधी मिळते. ही निवड सोपी नसते. फार क्वचित अशी संधी मिळते. कारण, निवड होण्यासाठीचे जे निकष आहेत ते अत्यंत कठोर पातळीवर तपासले जातात. मुख्य म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत सक्षम पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला समतोल राखता येणे आवश्यक असते. सुनीता व बूच हे दोघेही या निकषांवर पूर्ण उतरल्याने त्यांची निवड झाली. याशिवाय अॅस्ट्रॉनॉट क्रू ट्रेनिंग दिले जाते. हायड्रोलॅबमध्ये काम कसे करावे? याचा अनुभव दिला जातो. अंडरवॉटर लॅबमध्येसुद्धा काम करावे लागते.
►तेथील वातावरण नेमके कसे असते?
एखाद्या फुटबॉल मैदानाच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची रचना असते. अत्यंत आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी हायटेक लॅबोरेटरी तेथे असते. पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर हे स्पेस स्टेशन फिरत असते. हे इतक्या वेगात फिरते की 24 तासात सोळावेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पहायला मिळतो. यावरून त्याच्या फिरण्याच्या गतीची आपल्याला कल्पना येते.
►ही मोहीम कोणत्या कारणास्तव लांबली?
बोईंग स्टारलाईनर यानाने या दोघांना स्पेस स्टेशनमध्ये सोडल्यानंतर दोन*तीन दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की काही तरी बिघाड झाला आहे. 28 थ्रर्स्टर्सपैकी 5 थ्रर्स्टर्समध्ये बिघाड झाला असून बोईंगमधील हिलियम गॅस गळत होता. त्याचक्षणी नासाने बोईंगला ‘आपल्यातील करार तूर्त स्थगित झाला आहे’ असे स्पष्ट केले. म्हणजेच परतीचा प्रवास बोईंगने होणार नाही, हे नक्की झाले. बोईंग या दोघांशिवाय परत आले. सुनीता व बूच यांना तेथे रहावे लागेल, अशी कल्पना देण्यात आली. या दोघांचे यासाठी कौतुक करायला हवे की दोघांनीही वास्तवाचा स्वीकार केला. मुळात हीच बाब निवड करताना आणि प्रशिक्षणावेळी बिंबवली जाते.
या दोघांना परत आणण्याचा विचार सुरू केला तोपर्यंत अमेरिकेमध्ये सत्तापालट झाला. त्यानंतर इलॉन मस्कच्या ‘स्पेसएक्स ड्रॅगन’ने ही जबाबदारी घेतली. ही खासगी असली तरी मस्कने केलेली प्रचंड गुंतवणूक आणि अत्यंत प्रगत असे तंत्रज्ञान यामुळे 16 मार्चला स्पेसेक्स क्रू ड्रॅगन यान पुन्हा गेले आणि या दोघांच्या परतीचा प्रवास सुरू झाला. एक महत्त्वाची गोष्ट मी नमूद करू इच्छिते की परतीचा प्रवासही सोपा नसतो. गुरुत्वाकर्षणामुळे क्रू खेचला जातो. थोडीशी चूकसुद्धा अनर्थ घडवू शकते. कल्पना चावलाच्या बाबतीत याचा अनुभव आला आहे. म्हणूनच नासाने अत्यंत काळजी घेतली. तसेच नासा आणि स्पेसएक्सवर या दोघांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि हे परत आले. एका अर्थाने ‘मॅन अॅण्ड मशीन’ यांचे हे कॉम्बिनेशन (मानव आणि यंत्र यांचा सहयोग) होते.
►अशा मोहिमांमध्ये तांत्रिक बिघाडाची शक्यता गृहित धरली जाते का?
गृहित असे म्हणता येणार नाही. परंतु, स्पेसमध्ये अनपेक्षित असे काहीही घडू शकते. दिशा, वेग, नियंत्रण यामध्ये होणारी क्षुल्लक चूकसुद्धा जीवावर बेतू शकते. एखादा स्क्रू, सेन्सर किंवा कम्पोनंट अचूक नसेल तर सर्व काही फसण्याची व प्राणाची बाजी लागण्याची शक्यता असते. बोईंग स्टारलाईनरची ही पहिलीच मोहीम होती. त्यामुळे त्यांनाही याची कल्पना आली नाही आणि त्यांना दोष देऊन चालणार नाही. तांत्रिक चूक झाली, याचा अर्थ नासा परत बोईंग स्टारलाईनरशी करार करणार नाही, असेही नाही.
►तेथील वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे लागते?
आपण जसे उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो आणि थंडीमध्ये गरम कपडे वापरतो, तेथे असे चालत नाही. आतील सूट्स वेगळे असतात, बाहेरील स्पेस सूट्स वेगळे असतात आणि ते रेडिएशनप्रूफ असतात. सुनीताने स्पेस स्टेशनच्या बाहेर जवळजवळ 62 तास स्पेस वॉक केले. (खरे म्हणजे ते तरंगत असतात). आपण लवकर परतणार नाही, याची कल्पना आल्यावर दोघांनीही तेथे आधीच असलेल्या वेगवेगळ्या अॅस्ट्रॉनॉटना मदत केली. सुनीताने तेथील रोबोटिक आर्म दुरुस्त केला. सोलार पॅनल्स व सेल्ससाठी मदत केली. हॅम रेडिओचा प्रयोग केला. इतकेच नव्हे तर सॅलडसाठी तेथे लेट्यूससुद्धा उगवण्यात ती यशस्वी झाली. बऱ्याचदा विद्यापीठांनीसुद्धा त्यांना काही प्रयोगासाठी नेमलेले असते. त्यामुळे तेथे जे जे शक्य आहे ते ते करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
►सर्वसामान्य माणसाला त्यांचे भोजन कसे असते, याची उत्सुकता आहे. काय सांगाल?
स्पेस स्टेशनमध्ये फूड सप्लाय केला जातो. अन्य सामग्री पाठविली जाते. मात्र, संशोधन करून त्यांना किती पॅक्ड फूड पाठवायचे, त्यांना किती कॅलरीजची गरज आहे? हे ठरवून फूड पाठवले जाते. स्पेस फूडसाठी वेगळा रिसर्च विभाग असतो. आणखी एक म्हणजे बरीच माणसे व्यायामाचा कंटाळा करतात. परंतु, स्पेस स्टेशनमध्ये सहा तास व्यायाम हा बंधनकारक आहे.
►त्यांना काही शारीरिक आजार झाले तर उपचार कसे केले जातात?
आधी म्हटल्याप्रमाणे जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत, कोणत्याही खडतर परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात, त्यांचीच येथे निवड होते. तथापि, नासाचे काही डॉक्टर ऑनलाईन संपर्क ठेवून असतात. मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशक असतात. मात्र, कोणताही अॅस्ट्रॉनॉट असू दे, जे आहे ते स्वीकार करणे हे त्याच्या मनावर सतत बिंबवले जाते.
हे दोघेही पृथ्वीवर आल्यावर त्यांचे क्वॉरंटाईन का करण्यात येते?
स्पेस स्टेशनला जाऊन आल्यावर पृथ्वीबाहेरील काही बॅक्टेरिया, विषाणू त्यांना चिकटले आहेत का? याची चाचणी आवश्यक असते. सतत तरंगत राहिल्याने त्यांच्या पायातील शक्ती कमी झालेली आहे. सुनीताने तर आपल्या हातावरची पकड कमी झाल्याचे सांगितले आहे. त्यांची जीभ जड झालेली असते. एक प्रकारचे बधिरत्व त्यांना येते. त्यामुळे पुन्हा पूर्ववत होण्यासाठी त्यांना काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांवरही मोठी जबाबदारी असते. एखादे लहान मूल आधी रांगते, कधी धडपडते, मग चालण्याचा प्रयत्न करते. तसेच यांच्याबाबतीत ‘लर्न अॅण्ड रिलर्न’ असे करावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये भारताचा सहभाग नाही. आपण स्वायत्त कधी होणार?
हो, सध्या आपला सहभाग नाही. परंतु, इस्रोचे संशोधक एस. सोमनाथ हे इस्त्राsचे चेअरमन असताना त्यांनी यादृष्टीने तयारी सुरू केली. त्यामुळे भविष्यात भारतीय बनावटीचे गगनयान भारतीय अंतराळ स्टेशनमध्ये दोन वर्षात जाण्याची शक्यता नक्कीच आहे. विंग कमांडर सुधांशू गुप्ता आता नासामध्ये गेले आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये आपला देश पूर्णत: आत्मनिर्भर होऊन कार्यरत असेल, हे नक्की.
►आपण नासाच्या शास्त्रज्ञ आहात, या दोघांच्याबद्दल आपल्या भावना काय आहेत?
दोघेही आपल्या क्षेत्रात निपुण आहेत. त्यांचे स्वत:चे इंजिनिअरिंग कौशल्य वादातीत आहे. माझे प्रशिक्षणसुद्धा नासामध्ये झाल्याने सुनीता परतणार हा विश्वास मला होता. या दोघांच्या परतण्याबाबत अनेकांनी माझ्याजवळ शंका व्यक्त केल्या होत्या. परंतु, या दोघांचा आत्मविश्वास इतका कमालीचा आहे, की ते दोघे येणारच, याबाबत मला शंका नव्हती. नासा व स्पेसेक्स यांच्या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. परंतु, ‘बी फोकस, अॅक्सेप्ट अॅज ईट ईज, बी स्ट्राँग, बी ईन प्रेझेन्स’ हे सूत्र या दोघांनीही पाळले. यामुळे हे दोघेही ‘ग्लोबल हिरो’ आहेत.
कॅन्सर संस्थेला देणगी म्हणून दिले केस
सुनीता यांच्या सध्याच्या केशरचनेबद्दल अनेकांना कुतूहल आहे. त्याबद्दल विचारता लीना म्हणाल्या, सुनीता पहिल्या मोहिमेसाठी केस वाढवून गेली होती. परंतु, तेथे तिचा हेअरकट करण्यात आला. तिचे कापलेले केस अत्यंत व्यवस्थितपणे गोळा करून ते तिने कॅन्सर संस्थेला देणगी म्हणून दिले. कॅन्सरमुळे केस गेलेल्या व्यक्तींवर रोपण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. वास्तविक त्याची किंमत कितीतरी मिलियन झाली असती. परंतु, सुनीताने ते देणगी म्हणून दिले. हेच सुनीताचे वेगळेपण आहे. सुनीता केस बांधत नसल्याने ते उडताना दिसतात. परंतु, सौंदर्य किंवा तसे उपचार याकडे इथे लक्ष दिले जात नाही. येथे दिसणे महत्त्वाचे नसतेच, हे आपण लक्षात घेऊया.
‘जेथे आहात तेथील कामावर फोकस करा’
नासामध्ये किंवा अशा मोहिमांसाठी जे प्रशिक्षण दिले जाते, त्यामध्ये ‘कंपार्टमेंटलाईज’ म्हणजेच कप्पे पाडणे याला महत्त्व दिले जाते. सुनीता ही स्त्राr आहे. कोणत्याही स्त्राrला मल्टिटास्कींगचा अनुभव असतो. सुनीता त्याला अपवाद नाही. परंतु, मोहिमेवर असताना आम्हा कोणालासुद्धा घरच्या आघाडीवर काय चालले आहे? याचा विचार किंवा चिंता भेडसावत नाही. कारण ‘जेथे आहात तेथील कामावर फोकस करा’ हे आम्हाला सतत बिंबवले जाते, असे लीना बोकील म्हणाल्या.









