इस्रोच्या कौतुक सोहळ्यात पंतप्रधानांच्या तीन नव्या घोषणा : लँडर उतरलेले ठिकाण ‘शिवशक्ती’ तर चांद्रयान-2 चा स्पर्श झालेला बिंदू ‘तिरंगा
► वृत्तसंस्था/ बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेत चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. यादरम्यान, शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तीन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडरचा स्पर्श झालेले ठिकाण यापुढे ‘शिवशक्ती’ बिंदू म्हणून ओळखले जाईल. याशिवाय चांद्रयान-2 च्या पाऊलखुणा उमटलेले ठिकाण ‘तिरंगा’ बिंदू आणि चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झालेला 23 सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ (नॅशनल स्पेस डे) म्हणून साजरा करण्याची घोषणाही केली.
दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा चार दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी शनिवारी थेट बेंगळूरला परतले. येथे त्यांनी इस्रोचे मुख्यालय गाठून शास्त्रज्ञांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा करतानाच शास्त्रज्ञांचे भरभरून कौतुक केले. आपणा सर्वांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी तो फोटो पाहिला ज्यामध्ये आपल्या मून लँडरने ‘अंगद’ प्रमाणे चंद्रावर आपले पाय घट्ट रोवले आहेत. एका बाजूला विक्रमचा विश्वास, तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञानच्या शौर्याची प्रचिती संपूर्ण जगाला दिसून आली. आता आपली बुद्धिमत्ता चंद्रावर सतत पाऊलखुणा सोडत आहे. पॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे अप्रतिम आहेत. मानव सभ्यतेत पहिल्यांदाच पृथ्वीच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासात प्रथमच त्या ठिकाणाचे चित्र मानवी डोळ्यांनी पाहिले आहे. हे चित्र जगाला दाखवण्याचे काम भारताने केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

नामकरणाचे कारणही स्पष्ट
अंतराळ मोहिमेच्या टच डाऊन बिंदूला नाव देण्याची परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपले यान उतरलेल्या भागाचे नावही भारताने ठरवले आहे. चांद्रयान-3 चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, ते ठिकाण आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल. शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्ती आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याची क्षमता देते. चंद्राचा ‘शिवशक्ती’ बिंदू हिमालय कन्याकुमारीशी जोडलेला असल्याची जाणीव देतो, असे मोदी म्हणाले.
‘तिरंगा’ बिंदू आमचे प्रेरणास्थान
चांद्रयान-3 च्या यशात चांद्रयान-2 चे प्रयत्न पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. चंद्रावरील ज्या बिंदूने चांद्रयान-2 ने आपल्या पावलांचे ठसे सोडले त्याला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल. हा ‘तिरंगा’ बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाचे प्रेरणास्थान बनेल. हा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते याची जाणीव वेळोवेळी करून देईल, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने 2019 मध्ये चांद्रयान-2 मिशन प्रक्षेपित केले होते. चांद्रयान-2 चे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू न शकल्याने ही मोहीम अंतिम टप्प्यात अयशस्वी ठरली होती. मात्र, चांद्रयान-2 च्या अपयशातून धडा घेत भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 मोहिमेत यश मिळवले. यामुळेच पंतप्रधान मोदींनी तिरंगा बिंदू हे भारतीयांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.

23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अवकाश दिवस’
23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस आता राष्ट्रीय अवकाश किंवा अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत निश्चितच जागतिक नेता म्हणून उदयास येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संशोधनाची ही शक्ती भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि 2047 मध्ये भारताला विकसित देश बनवेल. भारतातील धर्मग्रंथांमध्ये सापडलेली खगोलशास्त्रीय सूत्रे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी, नवीन पिढ्या त्यांचा नव्याने अभ्यास करण्यासाठी पुढे आल्या. हे आपल्या वारशासाठी तसेच विज्ञानासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.
टच डाऊनचा क्षण कोणीही विसरणार नाही!
23 ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरतोय. टच डाऊनची खात्री झाल्यावर इस्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला, असेही पंतप्रधानांनी सांगितले. तसेच एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसऱ्या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इस्रो शास्त्रज्ञांच्या कामगिरीची स्तुती

तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल आहात. तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीला तोड नाही. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत, असे संबोधत पंतप्रधानांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची जोरदार स्तुती केली. तसेच शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष गळाभेट घेत आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत कर्तव्य सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला. यावेळी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थापही दिली.
नवा माईलस्टोन
चांद्रयान-3 मिशन हा नवा माईलस्टोन ठरला आहे. ही कामगिरी ‘नवभारताचा उदय’ असल्याचे वर्णनही पंतप्रधानांनी केले. इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे चंद्रावर उतरणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. त्यातही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. चांद्रयान-3 चंद्रावर उतरले तेव्हा मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होतो. तुमची त्वरित भेट घ्यावी, या इच्छेपोटी थेट बेंगळूरला आलो आहे. तुमच्या प्रयत्नांना हात जोडत आहे, असे भावनिक उद्गारही मोदींनी काढले.









