करणी सेनेसह क्षत्रिय समाजाने दाखवले काळे झेंडे
वृत्तसंस्था/ अलिगड
राणा सांगा यांना देशद्रोही म्हणणारे समाजवादी पार्टीचे खासदार रामजीलाल सुमन यांना रविवारी गभाना परिसरात निषेधाचा सामना करावा लागला. करणी सेना आणि क्षत्रिय समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर टायर फेकले. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. सुमन यांचा ताफा पोलिसांनी अर्धा किलोमीटर पुढे असलेल्या टोलनाक्यावर थांबवत त्यांना पोलीस संरक्षणात आग्रा येथे परत पाठविण्यात आले. सुमन यांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक आणि शाई फेकल्याचा आरोप केला आहे. ते बुलंदशहरातील सुनहरा गावात बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे वातावरण बिघडेल अशी भीती असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी टोलनाक्यावर आधीच पोलीस तैनात करण्यात आले होते.









