अलाहाबाद:
अलाहाबाद उच्च न्यायालयाने रामपूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्लाह नदवी विरोधात त्यांच्या पत्नी रुमाना नदवीकडून दाखल निर्वाह भत्ता याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. खासदार नदवी यांना स्वत:च्या चौथ्या पत्नी रुमाना नदवी यांना दर महिन्याला 30 हजार रुपयांचा निर्वाह भत्ता द्यावा लागणार असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढण्यासाठी मध्यस्थी तसेच तडजोड केंद्रात पाठविले असून दोन्ही बाजूंना तीन महिन्यांचा कालावधी देत वादावर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याची संधी देण्यात आली आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय दिला जात नाही तोवर खासदाराला स्वत:च्या पत्नीला दर महिन्याला 30 हजार रुपयांचा निर्वाहभत्ता द्यावा लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हे प्रकरण वैवाहिक वादाशी निगडित असून आमचा अशील हे परस्पर सहमतीने सोडवू इच्छितो असा युक्तिवाद खासदाराचे वकील नरेंद्र कुमार पांडे यांनी केला.









