नवी दिल्ली :
ग्लोबल रेटींग एजन्सी एस अँड पी यांनी आर्थिक वर्ष 2026 साठी जीडीपी दर नव्याने घोषित केला असून तो 6.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज नव्याने वर्तवला आहे. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर एस अँड पी यांनी भारताचा विकास दर कमी राहणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडून शुल्क आकारणीचा सिलसिला सुरु असून विविध देशांवर सध्या त्याचा दबाव पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ग्लोबल रेटींग कंपनी एस अँड पी यांनी सर्व परिस्थितीचा विचार करुन आर्थिक वर्ष 2026 साठी जीडीपी दर 6.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. याआधी एजन्सीने विकासदर 6.7 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले होते.
येणाऱ्या काळात मान्सून हा सामान्य असणार असून खाद्याच्या किंमती त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात रिझर्व्ह बँक 75 ते 100 बेसिस पॉईंटपर्यंत रेपो दरामध्ये कपात करु शकते. महागाई कमी झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेला रेपो दरात कपात करण्यासाठी पोषक वातावरण असेल, असेही रेटींग एजन्सीने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेनेही अलीकडच्या अंदाजामध्ये जीडीपी दर 6.5 टक्क्यांवरुन कमी करत 6.25 टक्के इतका केला आहे.









