वार्ताहर/धामणे
गेल्या आठ दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने नंदिहळ्ळी, धामणे, राजहंसगड, नागेनहट्टी या भागातील शेतकरी सोयाबीन, रताळी, बटाटा या पावसाळी पिकांच्या काढण्याच्या कामाला जोर आला आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी बांधवांना पावसाळी पिकांच्या पेरणीपासून ते आता ही पिके काढायला येईपर्यंत सतत पाऊस सुरूच राहिल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ही पावसाळी पिके काढण्यास उशीर झाला आहे. आतासुद्धा गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे या कामाला जोर आला आहे.
तरी सततच्या पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाची जास्त प्रमाणात नासाडी झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे रताळी व बटाट्याची पिके चांगली असूनसुद्धा पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे या भागातील शिवारात ओलावा जास्त आहे. त्यामुळे ही पिके काढण्यात व्यत्यय निर्माण होत असून पावसाने आणखीन आठ दिवस उघडीप दिल्यास रताळी व बटाटे ही पिके काढण्यास चांगली मदत होवून पीक काढलेल्या शेतात जोंधळा पेरणीस आणि इतर पिकांची लागवड करण्यास या भागातील शेतकऱ्यांना सोपे जाणार आहे. यंदा सोबाबीन पिकाला चांगला दर मिळत असला तरी या भागातील सोयाबीन पीक पावसाच्या माऱ्यामुळे कमी मळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.









