उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका : अपेक्षित दरापासून राहावे लागले दूर
बेळगाव : शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केल्यानंतर आता सोयाबीनच्या दरात हळुहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. विशेषत: हुक्केरी, चिकोडी, सौंदत्ती, बैलहोंगल, बेळगाव आदी तालुक्यामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित दरापासून दूर रहावे लागले. खरीप हंगामात सोयाबीनची अधिक प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र यंदा योग्य हमीभावाअभावी शेतकऱ्यांना मिळेल त्या दराला सोयाबीन विकावा लागला आहे. त्यानंतर आता सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत. सोयाबीन विकून तीन चार महिने उलटल्यानंतर दरात वाढ झाली आहे. यामुळे आता वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. खरीप हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबर, डिसेंबर दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणला जातो. मात्र या कालावधीत सोयाबीनचा दर कोसळला होता. आता शेतकऱ्यांनी सोयाबीनच विक्री केल्यानंतर बाजारात दर वाढू लागला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनला योग्य भाव मिळाला नसल्याने सोयाबीन घरी ठेवले होते. मात्र ते सोयाबीन यापूर्वी विक्री केले आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीतून चार पैसे मिळतील, असे वाटणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कमी दराने विक्री करावी लागल्याने आता सोयाबीन संपल्यानंतर दर वाढून काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









