कृषीखाते सज्ज, शेतकऱ्यांची धडपड, बी-बियाणे, खते उपलब्ध
बेळगाव : येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पेरणीसाठी लागणारी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके व यंत्रसामग्री खात्याने पुरविली आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषीखाते सज्ज झाले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात 7.53 लाख क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र यंदा पेरणीचे उद्दिष्ट कमी झाले आहे. मागील आठवड्यात वळिवाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामांनादेखील वेग आला आहे. मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे कृषीखाते आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय वेळेत हंगाम साधण्यासाठी रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघात बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संकरित बियाणांचा वापर करावा, असे आवाहनदेखील खात्याने केले आहे. जिल्ह्यात मे दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीपेक्षा आधिक खताचा साठा करण्यात आला आहे. युरिया 46,103 टन, डीएपी 17,646 टन, एमपीके 60,416 टन, एमओपी 3,128 टन खताचा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही खताची कमतरता जाणवणार नाही. विशेषत: खरीप हंगामात भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग, बटाटा, मका, सूर्यफूल, तंबाखू, आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बियाणांची आणि खतांची गरज असते. त्यामुळे वेळेत दर्जेदार बियाणे आणि खते पुरविली जाणार असल्याची माहिती खात्याने दिली आहे.
रयत संपर्क केंद्र/कृषी पत्तीन संघ
तालुक्यातील काकती, उचगाव आणि हिरेबागेवाडी याठिकाणी रयत संपर्क केंद्रे आहेत. तर नंदिहळ्ळी, बेळगुंदी, मारिहाळ, मुत्नाळ, मोदगा, हलगा, भेंडीगीरी, केके कोप, बडालअंकलगी आदी ठिकाणी कृषी पत्तीन संघ आहेत. या सर्व केंद्रामध्ये बी बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यकतेनुसार बी बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगामाचे पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खते, बियाणे आणि अवजारे उपलब्ध केली जाणार आहेत. रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघांमध्ये ही अवजारे उपलब्ध करण्यात आली आहेत. शिवाय पेरणीसाठी भात, सोयाबीन आणि इतर बियाणेदेखील सवलतीच्या दरात वितरीत करण्यात येणार आहे.
रयत संपर्क केंद्र-संघांमधून बियाणे, खते वितरीत करू!
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे व खताचा साठा मागणीपेक्षा अधिक आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. बियाणे, खते रयत संपर्क केंद्र, कृषी पत्तीन संघ आणि किरकोळ विक्री केंद्रामधून वितरीत केली जाणार आहे.
– राजशेखर विजापूर (सहसंचालक कृषीखाते)









