शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तयार केले सायकलवर चालणारे यंत्र
शेतकऱ्यांच्या कष्टाबरोबर आर्थिक बचत होणार
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
शेती म्हटले की नांगरणी, पेरणी आणि फवारणी आलीच. शेतीविषयक अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध असली तरी त्याचा खर्चही तेवढय़ा पटीत असतो. शेतकऱयांच्या खर्चात बचत व्हावी, एवढेच नाही तर त्यांना आरोग्यदायी जीवनाबरोबर शेतीची कामेही सहजपणे करता यावी, यासाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सायकलवर चालणारे पेरणी आणि गवत कापणी यंत्र तयार केले आहे. जुनी सायकल, ड्रम, चैनचा वापर करून तयार केलेल्या या शेतीविषयक यंत्रांना मागणी वाढत असल्याने लवकरच त्याचे उत्पादनात रुपांतर करण्यात येणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमधील यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करावी. यासाठी ‘शोध नाविण्याचा’ या उपक्रमांतर्गत शेतीसाठी पूरक अवजारे तयार केली आहेत. विद्यार्थ्यांनी औद्योगिक व कृषी क्षेत्राला कोणत्या अवजारांची व उपकरणांची गरज आहे, याचा अभ्यास करून ही यंत्रे तयार केली. या यंत्रांच्या माध्यमातून बागेतील लॉनचे कटींग करणे, सायकलला ड्रम लावून पाइंडल मारून औषधांची पिकांवर फवारणी होते. त्याचपद्धतीने गवत कापणी आणि पेरणी करणारे यंत्रेही विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. तसेच शेतीतील पालापाचोळा गोळा करून पुन्हा त्याचा शेतीमध्येच खत म्हणून वापर करण्यासाठीची प्रक्रिया करणारे यंत्रही तयार केले आहे. टाकाऊ आणि टीकाऊ अशा दोन्ही वस्तूंचा वापर करून ही यंत्रे तयार करण्यासाठी सहा महिने लागले. विद्यार्थ्यांच्या या नवसंशोधनाचे औद्योगिक व शेती क्षेत्रातून स्वागत होत आहे. तंत्रनिकेतनमधील इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत या संशोधन यंत्रांचे उत्पादनात रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल. ऐवढेच नाही तर बँकेकडून आर्थिक मदत व औद्योगिक कंपन्यांशी करार करून यंत्रे तयार करण्यासाठी तांत्रिक मदतही विद्यार्थ्यांना केली जाईल.
संशोधनाला आर्थिक मदतीची गरज
विद्यार्थ्यांनी सहा महिने संशोधन करून सायकल आणि सोलरवर तयार केलेले शेती उपयोगी यंत्रामुळे विजेची बचत होते. तसेच सोलर यंत्र कसे वापरायचे यासंदर्भात शेतकऱयांना माहिती मिळते. यातून त्यांचे कष्ट आणि पैशाचीही बचत होते. त्यामुळे शेतकऱयांकडून या यंत्रांची मागणी वाढत आहे. परंतू उत्पादन निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
पुस्तकी ज्ञानाबरोबर रोजगार निर्मिती
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर रोजगार निर्मिती करता यावी यासाठी विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. यातूनच या विद्यार्थ्यांनी शेतीसाठी पूरक अशी यंत्रे तयार केली आहेत. या यंत्रांचे उत्पादन करण्यासाठी बँकेकडून विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून दिले जाते. तसेच औद्योगिक कंपन्यांबरोबर करार करून यंत्रनिर्मितीला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय उभारणीस मदत होते.
प्रा. प्रमोद वायसे: (विभागप्रमुख यंत्र अभियांत्रिकी)
शेतीविषयक यंत्रे तयार करणारे विद्यार्थी व मार्गदर्शक
ज्ञानेश्वर गावडे, प्राजक्ता जाधव, देवयानी कोळसे-पाटील, संपदा कुंभार, सुशांत मोळे, अनुराग देशपांडे, रविंद्र लोकरे, निखिलेश माने, अभिषेक महिपाल, विशाल एरंडे, प्रसाद भोईटे, प्रसाद लष्कर, अच्युत आवार्डे, अथर्व सुतार, शुभम पाटील आदी विद्यार्थ्यांनी ही यंत्रे तयार केली आहेत. या संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रा. अपर्णा यादव, जिनेंद्र धोते, राजेंद्र डोईफोडे, भारतभूषण कांबळे, रेणुप्रसाद कुलकर्णी, युवराज ढोबळे, सुरेश बिरजे, यांचे मार्गदर्शन लाभले. तांत्रिक बाबींसाठी दत्ता सुतार, नारायण चव्हाण, अतुल साने यांचे सहकार्य लाभले.